Virat Kohli Post For India Under 19 Team: आयसीसी अंडर -१९ वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ४१२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला. शेवटी भारतीय संघाने हा सामना १०० धावांनी आपल्या नावावर केला. यासह भारताने सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. दरम्यान या विजयानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पोस्ट शेअर करून भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना २००८ मध्ये अंडर -१९ वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. आता या यादीत आयुष म्हात्रेच्या नावाचा देखील समावेश झाला आहे. वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघाला शुभेच्छा देताना विराट कोहली म्हणाला, “पुन्हा एकदा विश्वचषक उंचावल्याबद्दल भारतीय अंडर-१९ संघाचे अभिनंदन. वयोगट क्रिकेट आणि त्यापलीकडेही आपले वर्चस्व कायम आहे. संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफचे खूप खूप अभिनंदन.”

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. संघाचा सलामीवीर फलंदाज आरोन जॉर्ज अवघ्या ९ धावा करून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशीने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून १४२ धावांची भागीदारी केली. या खेळीदरम्यान आयुष म्हात्रेने ५३ धावांची खेळी केली. तर वैभव सूर्यवंशीने १५ चौकार आणि १५ षटकारांचा साहाय्याने १७५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ५० षटकांअखेर ९ गडी बाद ४११ धावा केल्या.

इंग्लंडला अंडर १९ वर्ल्डकप जिंकण्यासाठी ४१२ धावा करायच्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कॅलेब मॅथ्यू फाल्कोनेरने सर्वाधिक ११५ धावांची खेळी केली. तर बेन डॉकिंसने ६६ आणि बेन मेअसने ४५ धावा केल्या. इंग्लंडने पूर्ण जोर लावला. पण इंग्लंडचा संपूर्ण डाव ३११ धावांवर आटोपला.