करोना विषाणूचा सामना करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी क्रिकेटचे सामने बंद आहेत. लॉकडाउन काळात सर्व भारतीय क्रिकेटपटू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. मात्र क्रिकेटची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी आयसीसी व बीसीसीआय प्रयत्न करत आहेत. खेळाडूंना पुन्हा सराव सुरु करण्यासाठी आयसीसीने काही नियमावलीही आखून दिली आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने घरातल्या घरात व्यायम करत आपला फिटनेस कायम राखण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. अनेक आजी-माजी खेळाडूंच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु करण्याआधी खेळाडूंचा फिटनेस चांगला असणं आणि त्यांना किमान ४ ते ६ आठवडे सरावासाठी मिळणं गरजेचं आहे. विराट कोहलीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर स्पेशल इफेक्ट्स वापरून धावण्याचा सराव करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन द्या..असंही त्याने आपल्या चाहत्यांना सांगितलंय.

करोनाच्या प्रादूर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस स्पर्धेचं आयोजन करता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे.