Virat kohli Statement After Breaking Sachin Tendulkar record: विराट कोहलीच्या १३५ धावांच्या शतकी खेळीच्या बळावर व गिलच्या शतकासह भारताने वेस्ट इंडिजविरूद्धचा पहिला सामना ८ विकेट्सने आणि ९ षटकं शिल्लक ठेवत जिंकला. वनडेचा किंग ठरलेल्या विराट कोहलीने नाबाद १३५ धावांची खेळी करत दणका उडवला. विराटने ९ षटकार व १० चौकारांच्या मदतीने विराटने नाबाद १३५ धावा केल्या. याशिवाय विराटने सचिनचे २ मोठे विक्रम मोडले आहेत. याबाबत तो काय म्हणाला, जाणून घेऊया.
वनडेमध्ये १५ हजार धावांचा टप्पा गाठत सर्वात जलद हा पराक्रम करणाऱ्या विराट कोहलीने या विक्रमाबाबत प्रतिक्रिया दिली. विक्रम आणि वैयक्तिक मैलाचे दगड यांच्यावर आपलं लक्ष कधीच नसतं, असं कोहलीने स्पष्ट केलं.
विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावा पूर्ण केल्याबद्दल त्याचं कौतुक केलं आणि त्याला सचिनचा हा मोठा विक्रम मोडल्यानंतर काय वाटतंय, याबद्दल म्हणाला, “सर्वप्रथम या कौतुकाबद्दल धन्यवाद. खरं सांगायचं तर माझं लक्ष कधीच अशा माईलस्टोनवर राहिलेलं नाही. परिस्थिती समजून घेणं आणि संघासाठी जे काम करायचं आहे, ते योग्य पद्धतीने करणं, एवढंच माझं लक्ष असतं. बाकी विक्रम आपोआप येत राहतात. इतकी वर्षे खेळता आलं आणि आज मी ज्या स्थानावर आहे, त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान आणि कृतज्ञ समजतो.
“फक्त मान खाली ठेवून मेहनत करत राहायचं आणि आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार मानायचे. आपलं आयुष्य आणि हा प्रवास खूप भाग्याचा आहे. अनेकांना या ठिकाणी पोहोचायचं असतं, पण संधी काही मोजक्यांनाच मिळते. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत, हे लक्षात ठेवून दररोज शांतपणे मेहनत करत राहायला हवं,” असं विराट म्हणाला.
कारकिर्दीच्या या टप्प्यावर स्वतःच्या फलंदाजीत आणखी एक-दोन गिअर वाढवण्याचं आव्हान असल्याचंही कोहलीने सांगितलं. “कारकिर्दीच्या या टप्प्यावर खेळ आणखी वेगवान करण्याचं आणि एक-दोन गिअर वर खेळण्याचं आव्हान माझ्यासमोर आहे. माझ्यासाठी ही गोष्ट उत्साहवर्धक आहे. कारकिर्दीच्या या टप्प्यावर स्वतःचं नवं व्हर्जन शोधण्याची संधी मिळणं रोमांचक आहे. याचा फायदा मी ज्या संघासाठी खेळतो, मग तो भारत असो किंवा IPLमधील संघ, त्याला होतो,” असं कोहली म्हणाला.
त्याचबरोबर “फ्री माइंड”साठी फिट शरीर गरजेचं आहे, असंही विराटने सांगितलं. “माझ्यासाठी गोष्ट उलट्या पद्धतीने काम करते. मी स्वतःला शारीरिकदृष्ट्या फिट ठेवतो आणि त्यानंतर मैदानावर मला हवा तसा खेळ डोळ्यासमोर उभा करता येतो. त्यामुळे योग्य पद्धतीने मैदानात उतरून कामगिरी करण्याची माझी शक्यता वाढते. आजच्या सामन्यातही मला त्याचाच फायदा झाला,” असं कोहलीने सांगितलं.
शुबमन गिलबाबत विराट कोहली काय म्हणाला?
शुभमन गिलबरोबरच्या भागीदारीबद्दल बोलताना विराट कोहलीने त्याच्या नेतृत्वाचंही कौतुक केलं. “तो संघाचं नेतृत्व करतोय, यामागे कारण आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळाकडे कसं पाहायचं, याची त्याच्याकडे योग्य समज आहे. त्यामुळे अशा खेळाडूबरोबर फलंदाजी करताना भागीदारी रचणं फार कठीण नसतं,” असं कोहली म्हणाला.
“त्याला काय करायचं आहे, हे त्याला माहीत असतं आणि मला काय करायचं आहे, हे मलाही माहीत असतं. आपल्या अनुभवाच्या आधारावर कोणत्या क्षेत्रात आपण आणखी चांगलं खेळू शकतो, याबाबत अधूनमधून चर्चा होते. पण तो सध्या जगातील सर्वोत्तम वनडे फलंदाज आहे. त्यामुळे त्याला फार काही सांगण्याची गरज नसते,” असं विराटने स्पष्ट केलं.
गिलच्या फलंदाजीतील क्षमतेचंही कोहलीने कौतुक केलं. “फक्त भागीदारी चांगली रचायची आणि या संघात असलेल्या क्षमतेला आणि प्रतिभेला योग्य न्याय द्यायचा, एवढंच आमचं लक्ष्य असतं. तो जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे आणि निश्चितच खूप प्रतिभावान आहे. त्यामुळे फलंदाजी करताना त्याला फार काही सांगण्याची गरज पडत नाही. क्षेत्ररक्षणाच्या वेळी त्याला माझ्या मदतीची गरज भासली, तर मी नेहमीच त्याच्यासाठी उपलब्ध आहे,” असं कोहलीने सांगितलं.
