Virat Kohli on BCCI Family Restriction Rule: बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील भारताचा पराभव आणि डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारताला पात्रता मिळवता न आल्याने बीसीसीआयने खेळाडूंबाबत अनेक कठोर नियम लागू केले होते. यापैकी एक नियम खेळाडूंच्या कुटुंबियांबाबत होता. नियमानुसार, दौऱ्यात खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसोबत घालवता येणारा वेळ मर्यादित ठेवण्यात आला होता. विराट कोहलीने आरसीबीच्या कार्यक्रमामध्ये यावर वक्तव्य केलं आहे.
बीसीसीआयच्या नियमानुसार ४५ दिवसांच्या दौऱ्यात कुटुंबांना खेळाडूंसोबत फक्त १४ दिवस वेळ घालवण्याची परवानगी आहे. आता विराट कोहलीने या नियमावर मोठं वक्तव्य केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एका कार्यक्रमात कोहली म्हणाला की, जेव्हा जेव्हा मैदानावर काही गंभीर घडतं तेव्हा कुटुंबासह वेळ घालवणं खूप महत्त्वाचं असत. त्याच्या या वक्तव्यावरून ते बोर्डाच्या नियमांशी सहमत नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
आयपीएल 2025 पूर्वी, RCB इनोव्हेशन लॅबच्या इंडियन स्पोर्ट्स समिटमध्ये, विराट कोहली म्हणाला, “जेव्हा तुम्ही तणावात असाल तेव्हा तुमचं कुटुंब जवळ असणं किती महत्त्वाचे आहे हे लोकांना समजावून सांगणे खूप कठीण आहे. मला नाही वाटतं लोकांना याचं महत्त्व माहित असेल. आणि यामुळे मी निराश आहे कारण जे काही घडतंय ते नियंत्रित करू शकत नाहीत ते पुढे याचा मुद्दा बनवतात आणि मग सांगतात की अरे कुटुंबाला लांब ठेवलं पाहिजे.”
कोहली म्हणाला, “तुम्ही कोणत्याही खेळाडूला विचारा की, तुमचे कुटुंब तुमच्या आसपास असावं असं तुम्हाला वाटतं का? तर तो हो म्हणेल. मला माझ्या खोलीत जाऊन एकट्याने कुडत बसायचं नाही. मला नॉर्मल व्हायचं आहे. यानंतर तुम्ही तुमचा खेळही अधिक जबाबदारीने खेळू शकाल. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडाल आणि नॉर्मल जीवनात परतू शकाल.”
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यानही खेळाडू सामन्यानंतर आपल्या विजयाचा आनंद कुटुंबियांबरोबर साजरा करताना दिसले. पण खेळाडूंचे कुटुंबीय सर्वच सामने पाहण्यासाठी उपस्थित नव्हते.