Virat Kohli Statement After POTM Award: आरसीबीने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममधील अखेरच्या सामन्यात ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. गट टप्प्यातील आरसीबीचा घरच्या मैदानावरील हा अखेरचा सामना होता. आता संघ घरच्या मैदानावरील पुढील सामने रायपूरमध्ये खेळणार आहे. या सामन्यात विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्या खेळीने संघाचा विजयाचा पाया रचला. तर कृणाल पंड्याच्या अखेरच्या षटकांतील फटकेबाजीने विजयाचा कळस चढवला. विराटने सामनावीर पुरस्कारानंतर संघातील युवा खेळाडूचं भरभरून कौतुक केलं आहे.
विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांनी २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचली. ही भागीदारीचं सामन्याला कलाटणी देणारी ठरली. देवदत्तने अवघ्या २० चेंडूत आपलं अर्धशतक झळकावलं. पडिक्कल २७ चेंडूत २ चौकार व ६ षटकारांसह ५५ धावांची खेळी केली. तर विराट कोहली ४४ चेंडूत ८ चौकार व ४ षटकारांसह ८१ धावा करत बाद झाला. विराट या वादळी खेळीसह सामन्याचा सामनावीर ठरला.
सामनावीर पुरस्कारानंतर विराट कोहलीने देवदत्त पडिक्कलचं भरभरून कौतुक केलं. विराट म्हणाला, “आम्हाला सुरुवातीलाच पिचचा अंदाज घ्यावा लागला, कारण एक म्हणजे त्यांच्या संघाकडे दर्जेदार गोलंदाजी आक्रमण आहे आणि दुसरं म्हणजे बेंगळुरूमध्ये २०० धावांचा पाठलाग करताना आम्हाला माहित आहे की एक चांगली भागीदारी सामना फिरवू शकते. त्यामुळे मी आणि बेथेल यांच्यात सुरुवातीच्या काही षटकांत परिस्थिती समजून घेण्याबद्दल चर्चा झाली आणि त्यानंतर खेळावर आक्रमण करायचं ठरवलं.”
विराट कोहलीने कोणत्या खेळाडूचं केलं भरभरून कौतुक?
विराट कोहली देवदत्त पडिक्कलबाबत म्हणाला, “मला वाटतं, देवने या हंगामात दोन वेळा असं केलं आहे की तो मैदानात येताच पहिल्याच चेंडूपासून अप्रतिम खेळ दाखवतो. रबाडाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने मारलेला फटका शानदार होता. त्याच्याकडे खेळाची उत्तम समज आहे आणि विशेषतः अशा परिस्थितीत तो योग्य क्रिकेटिंग शॉट्स खेळून विरोधी संघाला त्रास देतो. २०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा करणं हे खरंच दुर्मिळ आहे. तो कधीही अंधाधुंद फटकेबाजी करत नाही, पण तरीही तो सहजपणे धावा करत राहतो आणि प्रतिस्पर्ध्यांना संधीच देत नाही. पहिल्या डावात देवची खेळीच सर्वात मोठा फरक ठरली. त्यानंतर माझा प्रयत्न होता की मी क्रीजवर टिकून राहावं, जेणेकरून त्याच्यावर सगळा दबाव येणार नाही. योग्य वेळी बाउंड्री मारणं ही माझी जबाबदारी होती. शेवटी, आमची भागीदारीच सामना जिंकवणारी आणि निर्णायक ठरली.”
देवदत्त पडिक्कलबरोबर भागीदारी साकारताना काय चर्चा सुरू होती, याबाबत किंग कोहली म्हणाला, “आमच्या गोलंदाजीच्या डावातही आम्ही खूप चांगली गोलंदाजी केली आणि सामना परत खेचला. एका टप्प्यावर ते २३०-२३५ धावांपर्यंत पोहोचतील असं वाटत होतं, पण आमच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत त्यांना शेवटी २०-२५ धावा कमीच रोखलं.’
विराट कोहली सामनावीर पुरस्कार मिळवल्यानंतर काय म्हणाला?
“पिचबद्दल मिळालेला फीडबॅक असा होता की ते वाईट नाही, उलट या हंगामातलं हे कदाचित सर्वात चांगलं फलंदाजीसाठीचं पिच होतं. चेंडू नीट बॅटवर येत होता, फिरकी गोलंदाजांना विशेष ग्रिप मिळत नव्हती आणि पिचवर चेंडू अडकत नव्हता. त्यामुळे आम्हाला वाटलं की जर आपण क्रीजवर टिकून राहिलो आणि मोठी भागीदारी उभी केली, तर विरोधी संघासाठी परिस्थिती अधिक कठीण होईल. एकदा परिस्थिती समजली आणि गोलंदाजांवर वर्चस्व मिळवलं की, मग आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही अधिक आक्रमण करू शकता. आमच्यातील चर्चा हिच होती. देव जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत होता आणि आमचा उद्देश गोलंदाजांवर सतत दबाव ठेवण्याचा होता.”
“ज्या गोलंदाजावर आक्रमण करायचं ठरवलं, त्याबाबत फलंदाज आणि नॉन-स्ट्रायकर दोघांकडूनही स्पष्ट मेसेज होता, ‘जा, आक्रमक फटके खेळ.’ त्यामुळे आमच्याकडे स्पष्ट रणनिती, आक्रमकता आणि एकमेकांकडून सतत योग्य फीडबॅक मिळत होता. या भागीदारीदरम्यान आम्हाला कोणताही संभ्रम नव्हता आणि हाच आमच्या यशाचा मुख्य घटक ठरला,” असं विराट कोहलीने अखेरीस सांगितलं.
