Virat Kohli Statement on his Fitness and Injury: आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्यात विराट कोहलीने ४९ धावांची खेळी करत पाठलाग करताना संघाच्या विजयाचा पाया रचला. आरसीबीने यासह १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १५.१ षटकांत १४९ धावा करत ५ विकेट्सने सहज विजय मिळवला. विराट कोहली ४९ धावांवर बाद झाल्याने त्याचं अर्धशतक हुकलं. पण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट पहिल्या क्रमांकावर पोहोचला असून आता ऑरेंज कॅप त्याच्याकडे आहे. ही कॅप स्वीकारल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या दुखापतीपासून खेळावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
विराट कोहलीला त्याच्या दुखापतीबद्दल विचारण्यात आलं. गेल्या सामन्यात विराटच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो फिल्डिंगसाठी उतरला नव्हता. याशिवाय लखनौविरूद्धच्या सामन्यात तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फक्त फलंदाजीला उतरला होता.
दुखापतीबद्दल विराट म्हणाला, “गेल्या सामन्यापेक्षा खूपच चांगलं वाटतंय. अजूनही मी पूर्णपणे फिट नाहीये. मागच्या सामन्यात माझ्या गुडघ्यामध्ये थोड्या वेदना होत्या. तब्येतीच्या दृष्टीनेही मी मागील चार-पाच दिवस थोडा अस्वस्थ होतो. त्यामुळे हळूहळू पुन्हा सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न करत आहे. आज मी चांगली सुरुवात केली, त्यामुळे माझ्या इन्टेन्सिटीबद्दल समाधान होतं. मात्र सामना पूर्ण करून संपवायला आवडलं असतं. कधी कधी परिस्थितीही लक्षात घ्यावी लागते. पिच खूपच स्लो झालं होतं आणि मला त्याच पद्धतीने खेळ सुरू ठेवायचा होता. पण शेवटी तो सामना पूर्ण करायला हवा होता, असं वाटतं.”
खेळपट्टीबद्दल किंग कोहली म्हणाला, “हो, पिच नेहमीपेक्षा संथ होतं. तुम्ही पाहिलं असेल, त्यावर गवतही फारसं नव्हतं. मागील ३-४ दिवस खूप उष्ण वातावरण होतं आणि वातावरण खूप कोरडं होतं. त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की पिच कोरडं आणि संथ असेल, चिन्नास्वामीवर खेळताना जसं कधी कधी टॅकी पिच मिळतं तसं नाही. त्यामुळे परिस्थिती वेगळी होती आणि म्हणूनच सुरुवातीच्या पाच-सहा षटकांतच सामना प्रतिस्पर्ध्यापासून दूर नेण्याची योजना होती. त्यासाठी पॉवरप्लेमधील फलंदाजी खूप महत्त्वाची होती. त्यामुळे आज माझ्या अॅप्रोचबद्दल मी समाधानी आहे, कारण मी सुरुवातीलाच संघाला आघाडी मिळवून देऊ शकलो.”
“तो गोलंदाजांचा हार्ट रेट तपासायला जातो…”, विराट कोहलीने सामन्यानंतर कोणाबद्दल केलं असं वक्तव्य?
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारबद्दल विराट कोहली म्हणाला, “आमच्या फलंदाजी युनिटसाठी काही मुद्दे ठरलेले आहेत, म्हणजेच रजतने जाऊन परिस्थितीचा अंदाज घ्यायचा असतो. पण मी त्याला नेहमी सांगतो, तू परिस्थिती नाही, तर गोलंदाजांचा ‘हार्ट रेट’ तपासायला जातोस, म्हणजे समोरचे खेळाडू किती दबावाखाली आहेत ते बघ. खरंच अप्रतिम खेळतो तो!”
“तसंच, आमच्या मॅनेजमेंटने संघाची रचना ज्या पद्धतीने केली आहे, त्यामुळे आम्हाला ठराविक शैलीत खेळता येतं. मला माझी भूमिका त्यानुसार बदलावी लागते. त्यामुळे मी सॉल्टसोबत सुरुवातीला आक्रमक खेळी करू शकतो. रोमारियो आणि टिमसारखे खेळाडू असल्यामुळे आम्हाला खूप स्वातंत्र्य मिळतं. कृणाल पंड्याला अजून एका सामन्यातही फलंदाजी करावी लागलेली नाही. आमच्याकडे अतिशय स्फोटक फलंदाजी युनिट आहे, जे सातत्याने कामगिरी करत आहे.”
“प्रतिस्पर्ध्यांच्या दृष्टीने पाहिलं, तर पाच विकेट्स पडल्यानंतरही रोमारियो आणि टिमसारखे खेळाडू मैदानात येणार असतील, तर ते खूपच धोकादायक वाटतं. हे खेळाडू फक्त चार षटकांत ५० धावा करू शकतात. त्यामुळे संघाला मोठा फायदा होतो आणि आम्हा सगळ्यांना खेळण्याचं अधिक स्वातंत्र्य मिळतं. माझ्यासाठी मात्र सगळं परिस्थिती आणि पिचवर अवलंबून असतं. प्रत्येक सामना २३०-२४० धावांचा असेलच असं नाही,” असं संघातील फलंदाजी आणि फलंदाजांच्या एकूण कामगिरीबद्दल विराट म्हणाला.
“आम्हाला माहिती आहे की खेळ खूप वेगाने पुढे जात आहे आणि आधुनिक क्रिकेट पूर्णपणे बदललं आहे. पण तरीही परिस्थितीवर लक्ष ठेवणं आणि दबावाखाली खेळताना योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं असतं. सध्या स्पर्धेचा पहिला टप्पा सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात सामने अधिक चुरशीचे होतील आणि खेळाडूंवरचा दबावही खूप वाढेल. जेव्हा स्वातंत्र्य कमी होतं आणि दबाव वाढतो, तेव्हा खेळातील स्मार्टनेस आणि परिस्थितीनुसार खेळण्याची क्षमता खूप महत्त्वाची ठरते. जो संघ परिस्थिती आणि पिचनुसार स्वतःला जुळवून घेईल, तोच पुढे जाईल,” सध्याच्या बदलत्या क्रिकेटबद्दल विराटने म्हटलं.
“हो, खेळ नक्कीच बदलला आहे. मीही माझ्या परीने त्यात जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आतापर्यंत ठिकठाक कामगिरी केली आहे असं मला वाटतं. मागील दोन सामन्यांत मी माझ्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नव्हतो, पण तरीही मी नेहमी स्वतःची पातळी उंचावण्याचा प्रयत्न करत असतो,” फिट नसूनही विराट स्वत:ला चांगलं करण्यासाठी कसा तयार करतो, याचं उत्तर त्याने अखेरीस दिलं.
