Virat Kohli Statement After POTM Award: किंग कोहलीने आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामन्यात आयपीएल इतिहासातील नववं शतक झळकावलं. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट कोहलीच्या नावे आहे. विराटने अवघ्या ५८ चेंडूत १० चौकार व ३ षटकारांसह शतक साकारलं. चेस मास्टर विराटच्या या खेळीमुळे आरसीबीने केकेआरने दिलेलं १९३ धावांचं लक्ष्य अखेरच्या षटकात सहज पूर्ण केलं. विराट कोहलीला त्याच्या नाबाद १०५ धावांच्या शतकी खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
विराट कोहलीने या सामन्यात ६० चेंडूत ११ चौकार व ३ षटकारांसह १०५ धावांची खेळी केली. गेल्या सलग दोन सामन्यांमध्ये डकवर बाद झालेल्या विराटच्या मोठ्या खेळीची अपेक्षा सर्वांनाच होती. विराट कोहली शतकाच्या जवळ असताना त्याचं शतक कधी पूर्ण होणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पण शतकी खेळी केल्यानंतर अनेकदा आक्रमक सेलिब्रेशन करणाऱ्या विराटने या शतकानंतर सेलिब्रेशन केलं नाही. यामागचं कारण त्याने सामन्यानंतर सांगितलं.
विराट कोहली शतकानंतरच्या सेलिब्रेशनबाबत काय म्हणाला?
विराट कोहली आयपीएलमधील विक्रमी नवव्या शतकाबद्दल म्हणाला, “खरं सांगायचं तर माझं सेलिब्रेशन फार मोठं नव्हतं, कारण सध्या प्रत्येक गुण किती महत्त्वाचा आहे हे आम्हाला चांगलं माहित आहे. माझ्यासाठी नेहमीच संघाच्या धावसंख्येत योगदान देणं माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट असते. मला माहित आहे की मी जितका जास्त वेळ मैदानात टिकेन, तितकी संघाच्या विजयाची शक्यता वाढते. गेल्या दोन सामन्यांत मला मोठी खेळी करता आली नव्हती आणि ते मला आतून खूप खटकत होतं. कारण मला माहित आहे की मी चांगली फलंदाजी करू शकतो आणि चेंडूही व्यवस्थित टायमिंग होत आहे. पण जेव्हा तुम्ही खेळी मोठी करू शकत नाही किंवा संघासाठी अपेक्षित योगदान देऊ शकत नाही, तेव्हा ते मनाला लागून राहतं.”
पुढे किंग कोहली म्हणाला, “इतकी वर्षं माझं एकच ध्येय राहिलं आहे, स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा करत संघासाठी सर्वोत्तम खेळाडू बनणं आणि सामन्यात प्रभाव पाडणं. त्यामुळे शतक झालं किंवा नाही, त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे सामना शेवटपर्यंत पूर्ण करणं आणि संघाला दोन महत्त्वाचे गुण मिळवून देणं. त्यातून आम्ही पुन्हा गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचलो.”
दबावाखाली फलंदाजी करण्याबद्दल विराटचं हुशार उत्तर
दडपणाखाली खेळण्याबद्दल विराट म्हणाला, “लोक म्हणतात ना, ‘दडपण ही एक संधी असते’, त्यामागे कारण आहे. दडपण तुम्हाला नम्र ठेवतं, लक्ष केंद्रित राहतं आणि सरावात अधिक मेहनत घ्यायला भाग पाडतं. त्यामुळे तुम्ही कधीही गोष्टी गृहित धरत नाही. मनातली ती धडधड, थोडंसं टेन्शन, हे चांगलं दडपण तुमचा खेळ सुधारायला मदत करतं. त्यामुळे मी नेट्समध्ये आणखी मेहनत घेत होतो. जेव्हा तुम्ही सातत्याने चांगलं खेळता, तेव्हा नकळत तुमची तीव्रता आणि फोकस थोडासा कमी होऊ शकतो. पण दोन सामने मनासारखे गेले नाहीत की पुन्हा ती अस्वस्थता जाणवायला लागते.”
“तेच तुम्हाला पुन्हा मेहनत करायला, स्वतःवर अधिक विश्वास ठेवायला आणि खेळात सुधारणा करायला भाग पाडतं. यात खूप ऊर्जा खर्च होते, पण त्यामुळे तुम्ही आणखी एका विशिष्ट पातळीवर पोहोचता आणि हळूहळू स्वतःचा खेळ अधिक चांगला करत जाता. शेवटी मागे वळून पाहिल्यावर अपयश किती महत्त्वाचं होतं हे लक्षात येतं. कारण तेच तुम्हाला पुन्हा त्या जागी आणून उभं करतं जिथून सर्वोत्तम कामगिरी घडते आणि तुमच्यातील तीव्रता कायम ठेवते. म्हणूनच लोक म्हणतात की दडपण ही एक संधी आहे.”
“आणि हो, मी नक्कीच थोडा नर्व्हस होतो. मला फक्त पहिली धाव काढायची होती आणि त्यानंतर थोडा आनंद साजरा करत खेळाचा आनंद घ्यायचा होता,” सलग दोनदा डकवर बाद झाल्यानंतर विराटने स्वत:ला पुन्हा कसं सावरत चांगली कामगिरी साकारली याबद्दल त्याने अखेरीस सांगितलं.
