IPL 2026 Virat Kohli Gesture win hearts Video: आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात १५ एप्रिलला सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने लखनौवर अवघ्या १५ षटकांत सोपा विजय मिळवला. या मोठ्या विजयासह आरसीबीचा संघ आता गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. या सामन्यानंतर मैदानावरील एका कृतीने सर्वांची मनं जिंकली आहे. लखनौ संघाचा एक खेळाडू थेट विराट कोहलीच्या पाया पडला आहे. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.

आयपीएल २०२६ च्या मैदानावर आरसीबी-लखनौ सामन्यानंतरच्या एका व्हीडिओने लाखो क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. एम चिन्नास्वामी मैदानावरील सामन्यानंतर, लखनौचा वेगवान गोलंदाज, नमन तिवारीने आपला आदर्श असलेल्या विराट कोहलीची भेट घेतली. या भेटीदरम्यान, नमन विराट कोहलीशी चर्चा करत होता. बोलता बोलता विराटने त्याला हात मिळवला आणि शुभेच्छा दिल्या.

विराटने हात मिळवल्यानंतर तो समोर बोलू लागला. तितक्यात नमन तिवारी आदराने खाली वाकला आणि विराट कोहलीच्या पायांना स्पर्श त्याच्या पाया पडला. विराटने पाहताच तो लगेच मागे सरकला आणि त्याला पाया पडू दिलं नाही आणि त्याच्याकडे पाहत काहीतरी म्हणाला. विराट कोहलीने त्याला मागे केलं आणि समोरच्या खेळाडूकडून पाहून म्हणाला, “अरे हा बघ पाया पडतोय.” किंग कोहलीच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत. नमनने आपल्या वरिष्ठ खेळाडूप्रती दाखवलेल्या आदराचे देखील कौतुक होत आहे.

कोण आहे विराट कोहलीच्या पाया पडणारा नमन तिवारी?

८ नोव्हेंबर २००५ ला लखनौमध्ये जन्मलेला नमन तिवारी भारतीय क्रिकेटचा नवा ‘स्पीड स्टार’ म्हणून उदयास येत आहे. हा डावखुरा वेगवान गोलंदाज त्याच्या ताशी १४५ किमी वेगासाठी आणि अचूक बाऊन्सरसाठी ओळखला जातो. नमन तिवारी उत्तरप्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. २०२४ च्या अंडर-१९ विश्वचषकात त्याने आपल्या कामगिरीची छाप पाडली होती. यानंतर लखनौ सुपर जायंट्सने त्याला आयपीएल २०२६ लिलिवात १ कोटींना संघात सामील केलं.

सामन्यानंतर विराट कोहली नमन तिवारी, मुकुल चौधरी, प्रिन्स यादव आणि इतर तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसला. विराट सातत्याने खेळाडूंशी चर्चा करत त्यांच्याशी आपला अनुभव शेअर करताना दिसला. चाहते त्याच्या या वागणुकीची तुलना महेंद्रसिंग धोनीशी करत आहेत. तो देखील अनेकदा सामन्यानंतर मैदानावर विरोधी संघाच्या तरुण खेळाडूंशी क्रिकेटसंबंधित अनेकदा चर्चा करताना दिसला आहे.