Virat Kohli Record On Social Media: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील अंतिम फेरीत दमदार खेळी केली होती. भारताने टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावल्यानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर गेल्यावर्षी त्याने कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली होती. सध्या तो भारतीय वनडे संघाचा भाग आहे. विराट जेव्हा जेव्हा मैदानावर उतरतो, त्यावेळी त्याला खेळताना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते तुफान गर्दी करतात. विराटची क्रिकेट कारकिर्द शेवटच्या टप्प्यात आहे, पण त्याची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. सोशल मीडियावर त्याचे फॉलोवर्स दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. क्रिकेटच्या मैदानावर अनेक रेकॉर्ड्स मोडणाऱ्या विराटने एक्स अकाऊंटवर (ट्विटर) सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटिंच्या शर्यतीत अमेरिकन रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियनला मागे टाकले आहे.

विराट कोहली हा जगभरात सर्वाधिक फॉलो केला जाणारा ११ व्या क्रमांकाचा व्यक्ती बनला आहे. सध्या एक्स अकाऊंटवर विराटचे ६९.९ मिलियन इतके फॉलोवर्स आहेत. त्याने या बाबतीत किम कार्दशियनला मागे टाकलं आहे. किम कार्दशियनचे एक्स अकाऊंटवर ६९.७ मिलियन इतके फॉलोवर्स आहेत. गेल्या दशकभरात विराट कोहलीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. त्याने क्रिकेटच्या मैदानावर अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ पाहायला मिळत आहे. एक्स अकाऊंटसह इस्टांग्राम आणि फेसबूकवरही विराटच्या फ़ॉलोवर्सची संख्या कोटींमध्ये आहे.

एक्स अकाऊंटवर सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल स्थानी आहे. तर क्रिकेट या खेळातील आणि आशिया खंडातील विराट हा एकमेव असा खेळाडू आहे, ज्याने टॉप-१५ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. जगभरात सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील समावेश आहे. एक्स अकाऊंटवर नरेंद्र मोदी यांचे १०६.९ मिलियन्स इतके फॉलोवर्स आहेत.

विराट कोहली केवळ एक्स अकाऊंटवर नाही, तर इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आघाडीवर आहे. त्याचे इंस्टाग्रामवर २७३ मिलियन्स इतके फॉलोवर्स आहेत. विराट हा आशिया खंडातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहे. विराटने क्रिकेटच्या मैदानावर अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. यासह लोकप्रियता आणि ग्लॅमरच्या बाबतीतही विराट जगभरातील अनेक सेलिब्रिटींना आव्हान देतो. आता विराट आणखी किती रेकॉर्ड मोडणार? याकडे क्रीडा प्रेमींचे आणि चाहत्यांचे लक्ष लागले आहे.