Virat Kohli Vrindavan Premanand Maharaj Allegation Updates: विराट कोहली आणि वृंदावन यांच्यात गेल्या काही वर्षांत आध्यात्मिक नातं अधिक दृढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासह अनेकदा वृंदावनला गेल्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर आपण पाहिले आहेत. आपल्या मुलांसह तर हे काही वेळेस दोघेच वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांच्या भेटीला गेले आहेत. पण विराट कोहलीसंबंधित एका दाव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे अध्यक्ष दिनेश फलहारी यांनी हा आरोप केला आहे.
क्रिकेटपटू विराट कोहलीशी संबंधित एका दाव्यामुळे वृंदावनमध्ये नवा वाद सुरू झाला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे अध्यक्ष दिनेश फलहारी यांनी आरोप केला आहे की, एका प्रॉपर्टी सिंडिकेटने कोहलीची प्रेमानंद महाराजांशी भेट घडवून आणण्यासाठी तब्बल ५ कोटी रुपये खर्च केले.
फलहारी यांच्या दाव्यानुसार, एका संतांशी विराट कोहलीची भेट घडवून आणण्यासाठी ५ कोटी रक्कम खर्च करण्यात आली. संबंधित संत हे प्रेमानंद महाराज असल्याची चर्चा आहे. फलहारी यांनी असा आरोप केला आहे की, प्रॉपर्टीशी संबंधित हितसंबंध असलेले काही लोक निवडक आध्यात्मिक व्यक्तींचा प्रभाव आणि प्रसिद्धी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, यामुळे यमुना खादर परिसरातील प्रस्थापित संतांच्या स्थानावरही परिणाम होत असल्याचा त्यांचा दावा आहे.
दिनेश फलाहारी नेमकं काय म्हणाले?
दिनेश फलहारी या व्हिडिओमध्ये म्हणाले, “आम्ही महाराजांना विनंती केली आहे की, इथे वृंदावनमध्ये संतांचे दोन गट पडले आहेत. एक आहेत खरे संत एक आहेत खोटे संत. काही प्रॉपर्टीचे व्यापारी त्यात घुसले आहेत, जे यमुना खादर परिसरातील जागा विकत आहेत. जे खरे चांगले संत आहेत, ते महाराजांकडे गेले. आम्ही महाराजजींना हीच विनंती केली आहे की तुम्ही वृंदावन सोडा आणि गोवर्धन गिरीराजजी इथे या, आम्ही बृजवासी तुमची सेवा करू. तुम्ही वृंदावनपासून दूर व्हा. कारण इथे प्रॉपर्टीवरून खूप मोठी प्रकरणं सुरू आहेत. मोठमोठे माफिया इथे सक्रिय झाले आहेत आणि तुम्हाला बदनाम करत आहेत. ज्या लोकांनी ५ कोटी रूपये देऊन विराट कोहलीला इथे आणलं होतं, तेच लोक यमुना खादर परिसरातील जागांचे व्यवहार करत आहेत. त्यांनी प्रॉपर्टीचं इतकं मोठं साम्राज्य इथे प्रस्थापित केलं आहे की मोठे अधिकारीही त्यांच्यासमोर नतमस्तक झाले आहेत.
“आमचं प्रेमानंद महाराजांना एवढंचं सांगणं आहे की ते एक चांगले संत आहेत. आधीही ते चांगलेच संत होते, आजही आहेत. तर प्रॉपर्टीचा हा जो खेळ सुरू आहे, राजस्थानचे जे डीलर यात सामील आहेत त्यांनी महाराजाजींचं नाव खराब केलं आहे. विराट कोहलीच्या नावाचा वापर करून यापूर्वी त्यांनी महाराजांना सहकार्य केलं होतं. त्यावेळी महाराजांची फारशी ओळख नव्हती. त्यांनी विराट कोहलीची महाराजांशी भेट घडवून आणली आणि त्यातून महाराजांचं नाव संपूर्ण जगभर पोहोचलं, त्यांचा ‘टीआरपी’ वाढला,” असं ते पुढे म्हणाले.
विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी जानेवारी २०२३ मध्ये पहिल्यांदा वृंदावनला भेट दिली होती. या दौऱ्यात त्यांनी नीम करोली बाबा आश्रम आणि माँ आनंदमयी आश्रमाला भेट दिली होती. यानंतर या दाम्पत्याने प्रेमानंद महाराजांच्या श्री राधा केली कुंज आश्रमालाही अनेकदा भेट दिली. जानेवारी आणि मे २०२५ मध्ये त्यांनी येथे भेट दिली होती. मे २०२५मधील ही भेट विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर घेतल्यानंतर काही काळातच झाली होती.
यानंतर विराट आणि अनुष्का यांनी डिसेंबर २०२५ मध्ये पुन्हा वृंदावनला भेट दिली. २०२६ मध्येही त्यांनी वृंदावनला भेट देत आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेतला.
