Virat Kohli Birthday Special Tattoo Story: भारतीय क्रिकेटचा रनमशीन आणि जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली आज (५ नोव्हेंबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या आक्रमक खेळाच्या बळावर विराटने क्रिकेटविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या विराटच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याच्या नावावर असून, कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्येही त्याने आपल्या फलंदाजीचा ठसा उमटवला आहे. याचदरम्यान त्याच्या टॅटूवरून त्याला कोचने चॅलेंज दिल्याचा किस्सा तुम्हाला माहितीये का?
फलंदाजीच्या पलीकडे, कोहलीने आपल्या वैयक्तिक शैलीनेही चाहत्यांना भुरळ घातली आहे, ज्याचा एक भाग म्हणजे त्याच्या शरीरावर असलेले अनेक टॅटू. मात्र, अशाच एका टॅटूमुळे त्याला एकदा आपल्या प्रशिक्षकाकडून ओरडाही खावा लागला होता. विराट कोहली अंडर-१७ क्रिकेट खेळत असतानाचा हा किस्सा आहे. त्या काळात तो ज्युनियर क्रिकेटमध्ये आपली कौशल्य विकसित करत होता आणि आपली प्रतिभा दाखवून देत होता. याच दरम्यान त्याने एक टॅटू काढला, ही घटना पुढे एक अविस्मरणीय प्रसंग ठरली.
विराट कोहलीचे दिल्ली अंडर-१७ क्रिकेटमधील तत्कालीन प्रशिक्षक अजित चौधरी यांनी कोहलीच्या सुरुवातीच्या कारकिर्दीतील आणखी एक रंजक किस्सा सांगितला आहे. जानेवारी २००६ मध्ये ते कोलकाता येथे झालेल्या १७ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत दिल्ली संघाचे प्रशिक्षक होते. बडोदाविरुद्धच्या उपांत्य सामन्याच्या आदल्या दिवशी विराटने हातावर टॅटू काढून संघात हजेरी लावली. हे पाहून अजित फारसे खूश नव्हते. त्यांनी विराटला या टॅटूचं समर्थन करण्यासाठी मोठी खेळी करून दाखवण्याचं आव्हान दिलं.
विराटनेही ते आव्हान स्वीकारलं आणि तब्बल २२८ धावांची शानदार खेळी साकारली. सामना संपल्यानंतर तो थेट कोच अजित यांच्याकडे गेला, त्यांना टॅटू दाखवला आणि म्हणाला, “कोचसाहेब, आता ठीक आहे ना?”
ज्यांनी गेल्या १८ वर्षांत विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारआकी आव्हान मिळाल्यावर तो किती आक्रमक पवित्रा घेत प्रत्युत्तर देतो. मात्र, या स्वभावाचा पाया त्याच्या ज्युनियर क्रिकेटच्या दिवसांमध्येच रचला गेला होता आणि त्याच्या प्रशिक्षकाकडून मिळालेलं हे एक आव्हान त्याचं एक उदाहरण होतं.
बडोदाविरुद्धच्या उपांत्य फेरीत, कोहलीने एक शानदार द्विशतक झळकावलं; त्याच्या २२८ धावांच्या खेळीमुळे दिल्ली संघ अंतिम फेरीत पोहोचला. विशेष म्हणजे, या उपांत्य सामन्यापूर्वीच्या सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध विराटने १२० धावा केल्या होत्या. तर मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ६० धावांची खेळी केली. विराटच्या या दमदार कामगिरीच्या बळावर दिल्लीने विजय मर्चंट ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं.
