Virat Kohli Premanand Maharaj Visit 5 Crore Claim Clarification: विराट कोहलीला वृंदावनमध्ये आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराजांच्या भेटीसाठी ५ कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा त्याच्या टीमने ठामपणे फेटाळून लावला आहे. हे आरोप “पूर्णपणे खोटे, निराधार आणि तथ्यहीन” असल्याचं कोहलीच्या टीमने स्पष्ट केलं आहे. या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. विराट कोहलीला आश्रमाच्या भेटीसाठी ५ कोटी रुपये मिळाल्याचं सिद्ध करणारी कोणतीही सार्वजनिक पेमेंट नोंद, करार किंवा अन्य पुरावा अद्याप समोर आलेला नाही.

श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे अध्यक्ष दिनेश फलहारी महाराज यांनी वृंदावनमधील एका संताची भेट घडवून आणण्यासाठी प्रॉपर्टी सिंडिकेटने ५ कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप केला होता. हा दावा एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आल्यानंतर त्यावरून वाद निर्माण झाला.

विराट कोहलीच्या टीमने अधिकृत निवेदन जारी करत म्हटलं, “विराट कोहली यांच्याबाबत फलहारी महाराज दिनेश शर्मा यांनी केलेले दावे पूर्णपणे खोटे, निराधार आणि तथ्यहीन आहेत, हे आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो. विराट कोहली महाराजजींवरील त्याची मनापासून असलेली श्रद्धा आणि आदरापोटीच त्यांची भेट घेतो. “आम्ही हे दावे ठामपणे फेटाळून लावतो. अशा प्रकारची विधानं प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा त्यांना अधिक प्रसिद्धी देण्यापूर्वी माध्यमांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, तथ्यांची पडताळणी करावी आणि जबाबदारीने वृत्तांकन करावं, असं आम्ही आवाहन करतो.”

विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी वृंदावनमधील प्रेमानंद महाराजांची अनेकदा भेट घेतली आहे. त्यांची प्रेमानंद महाराजांसोबतची पहिली चर्चेत आलेली भेट जानेवारी २०२३मध्ये झाली होती. त्यानंतर या दाम्पत्याने अनेक वेळा त्यांच्या आश्रमाला भेट दिली आहे.

Virat Kohli Team Statement on Dinesh falhari 5 crore claim
विराट कोहलीच्या टीमचं निवेदन

दरम्यान, क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहलीने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. तिरुवनंतपुरममध्ये खेळलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने नाबाद १३९ धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा ओलांडला आणि सचिन तेंडुलकरनंतर हा पराक्रम करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज ठरला.