Wasim Jaffer on Virat Kohli Test retirement: भारताचा रनमशीन अशी ओळख मिळवलेल्या विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा आणि मग पाठोपाठ विराट कोहली अशा दोन दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटला अलविदा केलं. पण विराट कोहलीच्या तडकाफडकी घेण्यात आलेल्या कसोटीच्या निवृत्तीवरून चर्चा अजूनही सुरू आहेत. मात्र, भारताचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांच्या मते, कसोटी क्रिकेटमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया ज्या पद्धतीने हाताळली गेली, त्याबद्दल विराट नाराज असण्याची शक्यता आहे.
विरा कोहली आणखी काही काळ कसोटी क्रिकेट खेळू शकला असता, असंही जाफर यांनी म्हटलं. त्याच्या निवृत्तीशी संबंधित परिस्थिती अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आली असती, असं त्यांना वाटतं. विराटने वर्षानुवर्षे भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कसोटी हा विराटचा सर्वात आवडता फॉरमॅट होता, पण ज्यापद्धतीने त्याने कसोटी क्रिकेटला अलविदा केलं हे पाहता जाफर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
वसीम जाफर आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाले, “ज्या पद्धतीने हे सगळं घडलं, त्याबद्दल विराट काहीसा नाराज होता, असं वाटतं. विराटसारखा खेळाडू स्टेडियममध्ये प्रेक्षकांना खेचून आणतो. त्याचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. तो निश्चितच आणखी काही काळ कसोटी क्रिकेट खेळू शकला असता. मात्र, विराट स्वतः नेमकं काय घडलं, हे सांगत नाही तोपर्यंत आपल्याला वस्तुस्थिती पूर्णपणे समजू शकणार नाही.”
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीपूर्वी अनेक महिने त्याच्या भवितव्याबाबत अनिश्चितता होती. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये खेळत राहण्याची आणि इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची इच्छा होती. जानेवारी २०२५मध्ये त्याने दिल्लीकडून रणजी ट्रॉफीचाही एक सामना खेळला होता. त्यातून लाल चेंडूच्या क्रिकेटप्रती असलेली त्याची बांधिलकीही दिसून आली होती. पण अचानक असं काय घडलं आणि विराटला कसोटीला अलविदा करावं लागलं अशी चर्चा चाहत्यांमध्ये सातत्याने सुरू होती.
विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी ७७० धावांची गरज होती. हा टप्पा गाठला असता, तर सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला असता. याशिवाय, आणखी पाच शतकं झळकावली असती, तर कसोटी क्रिकेटमध्ये ३५ शतकं करणारा तो जगातील आठवा फलंदाज ठरला असता.
कोहलीने भारताकडून १२५ कसोटी सामने खेळण्याआधीच निवृत्ती घेतली. आणखी दोन सामने खेळला असता, तर सामन्यांच्या संख्येत तो महान सुनील गावस्कर यांच्या बरोबरीला पोहोचला असता. ऑस्ट्रेलियाच्या २०२५च्या दौऱ्यातील कसोटी मालिका ही कोहलीची भारताकडून अखेरची मालिका ठरली. या मालिकेतील पाच सामन्यांमध्ये त्याने २३.७५च्या सरासरीने केवळ १९० धावा केल्या.
