Virat Kohli Vaibhav Sooryavanshi Interaction Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२६चं जेतेपद पटकावलं. विराट कोहली यादरम्यान आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरला. आरसीबीच्या विजयानंतर किंग कोहली आणि यंदाच्या स्पर्धेत आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या भेटीच्या व्हीडिओने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. विराट कोहली वैभव सूर्यवंशीबरोबर चर्चा करताना दिसला होता. पण त्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली होती, विराटने सूर्यवंशीला काय सल्ला दिला, हे आता आरसीबीने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये उघड झालं आहे.
अवघ्या १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी हा आयपीएल २०२६ हंगामातील सर्वात चर्चेत राहिलेल्या खेळाडूंपैकी एक ठरला. ३१ मे रोजी झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सवर पाच विकेट्सने मात करत विजेतेपद पटकावलं, पण संपूर्ण हंगामात वैभवने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. त्याच्या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने ऑरेंज कॅप, इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर (MVP) हे तीनही प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले. तसेच राजस्थान रॉयल्सला स्पर्धेत दमदार मजल मारून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.
वैभव-विराटच्या भेटीचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या भेटीदरम्यान माजी भारतीय कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने वैभवला काही महत्त्वाच्या आणि मोलाच्या सूचना दिल्या. बुधवारी आरसीबीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर विराट आणि वैभव यांच्यातील संवादाचा व्हीडिओ शेअर केला. विजेतेपदानंतर झालेल्या या खास संभाषणाचा व्हिडीओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
विराट कोहलीने वैभव सूर्यवंशीला काय सल्ला दिला?
विराट कोहलीने वैभव सूर्यवंशीची भेट घेतल्यानंतर त्याला मोलाचा सल्ला दिला. यादरम्यान बोलताना विराट म्हणाला, “इथून खूप पुढे जायचं आहे. आतापर्यंत जी मेहनत घेतली, त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे. आता कोण काय म्हणतंय, सगळं जाऊदे. तुझी बॅट आणि फक्त तू यावर लक्ष क्रेंदित ठेव. एक बिहारी सब पे भारी फिर खतम गेम…”, असं अखेरीस विराटने म्हणत हसत हसत वैभव सूर्यवंशीला हात मिळवला. वैभव-विराटच्या भेटीचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये कोहलीने वैभवला सुरुवातीच्या यशावर समाधान न मानता त्याचा पाया अधिक मजबूत करण्याचा आणि सातत्याने स्वतःमध्ये सुधारणा करत राहण्याचा सल्ला दिला. तरुण वयात मिळालेल्या यशानंतरही लक्ष विचलित न करता मेहनत सुरू ठेवण्याचं विराटने सांगितलं. वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये केलेल्या दमदार कामगिरीनंतर विराट कोहलीसारख्या दिग्गजाकडून मिळालेला हा सल्ला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
