Virat Kohli On RCB: आयपीएल २०२६ स्पर्धेला येत्या २८ मार्चपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक स्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळे पहिल्याच सामन्यात चौकार- षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. हे हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी अतिशय खास असणार आहे. कारण १९ वर्षांत पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गतविजेता म्हणून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर जेतेपद राखण्याचं आणि चांगली कामगिरी करण्याचं दडपण असणार आहे. दरम्यान आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी संघातील सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहलीने आपल्या संघाला वॉर्निंग दिली आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धेला सुरूवात होण्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सराव करायला सुरूवात केली आहे. संघातील सर्व खेळाडू संघासोबत जोडले गेले आहेत. विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमारसारख्या प्रमुख खेळाडूंनी कसून सराव केला. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात विराट कोहली आपल्या सहखेळाडूंसोबत चर्चा करताना दिसून येत आहे. विराट म्हणाला, “आपण गेल्या २-३ हंगामापासून कसून मेहनत केली आहे. त्यामुळे आपल्याला आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यात यश आलं आहे. आपलं काम आता आणखी कठीण होणार आहे. कारण इतर संघ आणखी तयारीसह मैदानात उतरणार आहेत.”

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आपला पहिला सामना २८ मार्चला सनरायझर्स हैदराबादविरूद्ध खेळणार आहे. विराटने सराव सत्रात सहभागी असलेल्या सहकाऱ्यांना संबोधित करताना म्हटले की, “आगामी स्पर्धेची सुरूवात होण्यापूर्वी हे दिवस आपण वाया घालवू शकत नाही. त्यामुळे आता आपण पूर्णपण सज्ज व्हायला हवे. आपण ज्या सत्राचा भाग असू, त्या सत्राचा एकही मिनिट वाया घालवून चालणार नाही. आपल्याला या अडीच महिन्यात १२० टक्के योगदान द्यावे लागणार आहे. आपण या आव्हानासाठी स्वत:ला पूर्णपणे तयार करू.”