Virat Kohli Watch: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे ऑकलंडमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडचा डाव अवघ्या १८५ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने दमदार अर्धशतकी खेळी केली आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान विराट कोहलीचास एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि शुबमन गिलची जोडी चांगलीच जमली होती. त्यावेळी १८ व्या षटकात डफीने टाकलेला शॉर्ट चेंडू विराटच्या हाताला जाऊन लागला. त्यावेळी त्याच्या हातात असलेलं घड्याळ तुटून खाली पडलं. विराटने घड्याळ तर उचललं. पण त्याची पिन तिथेच पडून होती. त्यामुळे तो ती पिन शोधत होता. पण त्यानंतर अंपायरने ती पिन शोधून दिली. ज्यावेळी अंपायरने ती पिन विराटच्या हातात दिली. त्यावेळी त्याला हसू अनावर झालं. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
भारतीय संघाचा दमदार विजय
भारतीय संघाला सुरुवातीला हा सामना जिंकण्यासाठी १८६ धावा करायच्या होत्या. पण भारताला हवी तशी सुरुवात करता आली नाही. करण रोहित शर्मा शून्यावर माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली आणि शुबमन गिलने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला आणि ११३ धावांची भागीदारी केली. यादरम्यान २ वेळा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघाला अवघ्या १४३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना विराटने ७४ धावांची खेळी केली आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड
या सामन्यात विराट कोहलीने एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर त्याने १२ धावा करताच वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

यासह वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३ हजार धावा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. या मालिकेतील अजूनही ४ सामने शिल्लक आहेत. या ४ सामन्यांमध्ये तो आणखी मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतो.
