भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. कसोटी क्रिकेट असो किंवा वन-डे आणि टी-२० प्रत्येक सामन्यात विराट कोहली खोऱ्याने धावा काढतो आहे. आगामी काळात विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा शंभर शतकांचा विक्रम मोडेल, असं भाकीत वर्तवलं आहे भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने. तो एका मुलाखतीमध्ये बोलत होता.

“सध्या विराट कोहली ज्या वेगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा काढतो आहे ते पाहता सचिनचा शंभर शतकांचा विक्रम मोडायला त्याला फारसा वेळ लागणार नाही. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात, आणि सचिनचा शंभर शतकांचा विक्रम विराट मोडेल असं माझं मत आहे.” विराट कोहलीने विंडीज दौऱ्यात नुकतचं ४३ वं वन-डे शतक ठोकलं. सचिनचा ४९ शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराटला ७ शतकांची आवश्यकता आहे. याचसोबत सचिनचा शंभर शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराट अजूनही ३३ शतकं दूर आहे.

दरम्यान विंडीज दौऱ्यात मर्यादीत षटकांच्या सामन्यात आश्वासक फलंदाजी करणाऱ्या विराटची कसोटी मालिकेत चांगली सुरुवात झालेली नाहीये. अँटीग्वा कसोटीत पहिल्या डावात अवघ्या ९ धावा काढून विराट गॅब्रिअलच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला.