कसोटी, एकदिवसीय संघाचे नेतृत्व कायम; नवा कर्णधार रोहित?

संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोहलीने गुरुवारी ट्विटरवरून जाहीर केले; परंतु कसोटी आणि एकदिवसीय संघांचे कर्णधारपद सांभाळणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

२०१७मध्ये कोहलीने भारताच्या दोन्ही मर्यादित षटकांच्या संघांची कर्णधारपदाची सूत्रे महेंद्रसिंह  धोनीकडून स्वीकारली. यानंतरच्या ६७ सामन्यांपैकी ४५ सामन्यांतच विराटला खेळवले गेले. त्याच्यावरील ताण कमी करण्यासाठी त्याला हल्ली टी-२० सामन्यांमधून विश्रांती दिली जाते. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भारतीय टी-२० संघाचा मार्गदर्शक म्हणून नेमणूक झाली. ही नियुक्ती विराटवर दबाव आणण्यासाठी आहे की त्याला साह्य करण्यासाठी आहे, याविषयी तर्क लढवले जाऊ लागले आहेत.

विराट आणि रोहित

दुभंग नेतृत्वाविषयीची चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात गेले काही महिने सुरू आहे. विराट कोहली हा उत्तम फलंदाज असला तरी त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आजवर एकही अजिंक्यपद मिळू शकलेले नाही हे वास्तव आहे. त्यामुळे विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व आणि रोहित शर्माकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व सोपवण्याच्या चर्चेने जोर धरला होता. विराटच्या विरोधात जाणारी आणखी एक बाब म्हणजे, आजवर त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाला आयपीएलमध्येही जिंकून देता आलेले नाही. उलट रोहित शर्माने पाच आयपीएल अजिंक्यपदांमध्ये मुंबई इंडियन्सचे यशस्वी नेतृत्व केलेले आहे. संघ सहकाऱ्यांकडून उत्तम कामगिरी करवून घेण्यात रोहितने अधिक कल्पकता दाखवलेली दिसते.

गेली आठ-नऊ वर्षे

तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळताना आणि पाच-सहा वर्षे नेतृत्व करताना खेळाचा ताण मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटच्या नेतृत्वासाठी स्वत:ला पूर्णत: सज्ज राखण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे.  – विराट कोहली