Virat Kohli World Record Surpass Chris Gayle: किंग कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये आपलं नाव सोनेरी अक्षरात लिहिलं आहे. विराटने आयपीएल २०२६ मध्ये केकेआरविरूद्ध सामन्यात शतकी खेळीदरम्यान आपल्या नावे विश्व विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएल २०२६ च्या मागील दोन सामन्यांमध्ये विराट कोहली डकवर बाद झाला, पण यानंतर त्याने दमदार पुनरागमन करत केकेआरविरूद्ध सामन्यात थेट शतक झळकावलं. या सामन्यात कोहलीने एक असा पराक्रम केला, जो यापूर्वी टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूने केला नव्हता.

विराट कोहलीच्या फलंदाजीवर या सामन्यात सर्वांच्या नजरा होत्या. विराटने या सामन्यात पहिली धाव घेताच जणू विक्रमी अर्धशतक शतक केल्यासारखं सेलिब्रेशन केलं. यानंतर विराटने या सामन्यात ७८ धावांचा पल्ला गाठताच टी-२० इतिहासात १४ धावांचा विक्रम रचला. टी-२० इतिहासात १४ हजार धावा करणारा तो जगातील सहावा खेळाडू ठरला आहे. या विक्रमानंतर विराट कोहलीने शतकी खेळीदेखील साकारली. विराटने अवघ्या ५८ चेंडूत आपलं विक्रमी नववं आयपीएल शतक झळकावलं.

विराट कोहलीची गणना जागतिक क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील महान खेळाडूंमध्ये केली जाते. आता विराट टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये १४ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे, त्याने हा टप्पा केवळ ४०९ डावांमध्ये गाठला. विराट कोहली हा १४ हजार धावा करणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. तर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १४ हजार धावा करणारा तो जगातील पहिला खेळाडू आहे. विराट कोहलीने ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडत १४ हजार धावांचा पल्ला अवघ्या ४०९ डावांमध्ये पूर्ण केला. तर ख्रिस गेलने १४ हजार धावांचा हा विक्रम ४२३ डावांमध्ये पूर्ण केला होता.

टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये १४,००० धावा करणारे खेळाडू

विराट कोहली (भारत) – ४०९ डाव
ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – ४२३ डाव
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – ४३१ डाव
जोस बटलर (इंग्लंड) – ४६८ डाव
ॲलेक्स हेल्स (इंग्लंड) – ५०५ डाव
किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज) – ६३३ डाव

टी-२० फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा टी-२० क्रिकेटच्या ४५६ डावांमध्ये १२४९१ धावा करून दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय विराट कोहली टी-२० इतिहासात सर्वाधिक शतकं करणाराही भारताचा पहिला खेळाडू आहे, त्याच्या नावे १० शतकं आहेत.

विराट कोहलीचं विक्रमी शतक

केकेआरविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावलं, ज्यामुळे त्याने आता टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांच्या यादीत डेव्हिड वॉर्नरची बरोबरी साधत तिसरं स्थान पटकावलं आहे. विराटचं हे टी-२० मधील १०वं शतक आहे. या यादीत ख्रिस गेल २२ शतकांसह अव्वल स्थानी आहे, तर बाबर आझम १३ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएल शतकांमध्ये कोहली आधीच पहिल्या क्रमांकावर असून, हे त्याचे नववं शतक आहे.