Virat Kohli World Record: सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीने क्रिकेट इतिहासात आणखी एका विक्रमाची नोंद केली. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात खेळताना त्याने श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराचा विश्वविक्रम मोडीत काढला. यासह विराट कोहलीने आपल्या नावे नव्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली आहे. वनडेचा किंग असलेल्या विराटने या फॉरमॅटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे.

२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी धावांची आपली भूक शमणार नाही, हे विराट कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. गुरुवारी, इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने दमदार अर्धशतक झळकावलं. तो आपल्या ५५ ​​व्या शतकाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत होता, परंतु ६५ धावांवर जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

विराट कोहलीने बाद होण्यापूर्वी वनडे इतिहासात अजून एक विश्वविक्रम आपल्या नावे केला. विराट कोहलीने विरोधी संघाच्या मायदेशात सर्वाधिक वनडे धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. ३७ वर्षीय विराट कोहलीला या विक्रमासाठी कार्डिफमधील दुसऱ्या वनडे सामन्यात केवळ ४६ धावांची गरज होती. भारताच्या डावातील २४व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ४६वी धाव पूर्ण करताच त्याने कुमार संगकाराचा ५,५१८ धावांचा विश्वविक्रम मागे टाकत या यादीत अव्वल स्थान पटकावलं.

श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने विरोधी संघाच्या मायदेशात खेळलेल्या १४९ वनडे सामन्यांत ५,५१८ धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे, कार्डिफमधील हा सामना विराट कोहलीच्या विरोधी संघाच्या मायदेशात खेळला जाणारा १२६वा वनडे असून, संगकारापेक्षा २३ सामने कमी खेळूनच त्याने हा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला.

याशिवाय विराट कोहलीने या सामन्यात ६५ धावांची खेळी करत विरोधी संघाच्या मायदेशात आणि तटस्थ मैदानांवर खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यांमध्ये ८ धावांचा टप्पा पूर्ण केला. सध्या भारताकडून विदेशात खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यांत ८ हजारहून अधिक धावा करण्याचा पराक्रम फक्त सचिन तेंडुलकर (११,४५०) आणि सौरव गांगुली (८,१११) यांनीच केला आहे. विराट हा टप्पा गाठणारा तिसरा भारतीय ठरला. विशेष म्हणजे, विरोधी संघाच्या मायदेशात आणि तटस्थ मैदानांवर ८ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारे जगात केवळ सातच फलंदाज आहेत.

इतर संघांच्या घरच्या मैदानावर वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

विराट कोहली (भारत) – १२६ धावा – ५५४१* धावा
कुमार संगकारा (श्रीलंका) – १४९ धावा – ५५१८ धावा
रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) – १३२ धावा – ५०९० धावा
सचिन तेंडुलकर (भारत) – १४७ धावा – ५०६५ धावा
एम एस धोनी (भारत) – १४५ धावा – ४५२० धावा