जय हिंद..! भारताचा टी-२० कप्तान म्हणून विराटची शेवटची पोस्ट; म्हणाला, “पुन्हा एकदा…”

टी-२० वर्ल्डकपमधील नामिबियाविरुद्धचा सामना संपल्यानंतर विराटनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

virat kohlis final post on social media as a t20 captain of team india
विराट कोहली आणि टीम इंडिया

टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताने नामिबियाला हरवत आपली मोहिम संपवली. भारताने स्पर्धेत चांगली कामगिरी केली नसली, तरी शेवटच्या तीन सामन्यात भारताने दमदार विजय नोंदवत आपल्या शक्तीची साक्ष दिली. उशिराने का होईना, परंतु भारतासा सूर गवसला. बलाढ्य संघ स्पर्धेबाहेर गेल्यामुळे उर्वरित संघांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे. महत्त्वाचे म्हणजे विराट कोहलीने टी-२० कप्तानपदही सोडले. आता तो फक्त खेळाडू म्हणून टी-२० संघात आपले योगदान देईल.

नामिबियाविरुद्धच्या सामन्यानंतर आणि टी-२० कप्तान म्हणून विराटने शेवटची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणाला, ”एकत्रितपणे आम्ही आमचे ध्येय साध्य करण्यासाठी निघालो. दुर्दैवाने आम्ही कमी पडलो आणि आमच्यापेक्षा कोणीही जास्त निराश झालेले नाही. तुम्हा सर्वांचा पाठिंबा अप्रतिम होता आणि आम्ही त्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत. आम्ही दमदार पुनरागमनासाठी पुन्हा एकदा सज्ज होऊ आणि आमचे सर्वोत्तम पाऊल पुढे टाकण्याचे ध्येय समोर ठेऊ. जय हिंद.”

भारताची नामिबियावर मात..

टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ टप्प्यातील अंतिम सामन्यात भारताने नामिबियाला ९ गड्यांनी सहज मात दिली. या विजयासह भारताने आपल्या वर्ल्डकप मोहिमेचा शेवट गोड केला. महत्त्वाचे म्हणजे भारताचा टी-२० कप्तान म्हणून विराटचा तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रींचा हा शेवटचा सामना होता. दुबईच्या मैदानावर विराटने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकी गोलंदाजीपुढे नामिबियाचे फलंदाज अपयशी ठरले. २० षटकात नामिबियाला ८ बाद १३२ धावा करता आल्या. जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी ३ तर बुमराहने २ बळी घेत नामिबियाला तंगवले.

हेही वाचा – TOO FAST..! टीम इंडियाला सोडताच रवी शास्त्रींना मिळाली ‘नवी’ जबाबदारी; कॉमेंट्री नव्हे, तर…

प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकत भारताचा विजय सुकर केला. रोहित आक्रमक अर्धशतक ठोकून माघारी परतला. त्यानंतर राहुल-सूर्यकुमारने विजयावर शिक्कामोर्तब केले. जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virat kohlis final post on social media as a t20 captain of team india adn

Next Story
TOO FAST..! टीम इंडियाला सोडताच रवी शास्त्रींना मिळाली ‘नवी’ जबाबदारी; कॉमेंट्री नव्हे, तर…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी