भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल की नाही असा प्रश्न अनेक वेळा क्रिकेट चाहते एकमेकांना विचारत असतात. अनेक आजी-माजी खेळाडूंनी याविषयी आपलं मत नोंदवलं आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक किलसच्या मते, केवळ विराटचं सचिनचा विक्रम मोडू शकले की नाही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो.

“विराट कोहली कारकिर्दीत अजुन खूप लांबचा पल्ला गाठू शकतो. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. त्याच्यात धावांची भूक आहे, त्यासाठी तो अजुनही खडतर मेहनत करतो. त्याला फलंदाजी करत असताना पाहणं प्रेक्षकांना आवडतं. त्यामुळे आगामी काळात विराटने आपली शाररिक तंदुरुस्ती कायम राखली तर तो सचिनचा विक्रम नक्की मोडू शकेल.” कॅलिस एका खासगी कार्यक्रमात बोलत होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेमध्ये घरच्या मैदानावर खेळत असताना भारताला टी-२० आणि वन-डे मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवाचा भारताच्या विश्वचषक तयारीवर काही परिणाम होणार नाही असंही मत कॅलिसने व्यक्त केलं. विश्वचषकात भारतीय संघावर कोणताही दबाव नसेल असं कॅलिस म्हणाला.