लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या या कसोटीत आघाडीचे तीन फलंदाज ५५ धावांत माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा (४५ धावा) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (६१ धावा) यांनी चिवट झुंज देत भारताचा डाव सावरला. परंतु अखेरच्या सत्रात या दोघांसह रवींद्र जडेजासुद्धा बाद झाल्याने भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी क्रिकेट लढत निर्णायक अवस्थेत येऊन ठेपली आहे. भारताने दुसऱ्या डावात ६ बाद १८१ धावा केल्या असून पाहुण्यांकडे १५४ धावांची आघाडी आहे. अंधूक सूर्यप्रकाशामुळे चौथ्या दिवशी खेळ लवकर थांबवण्यात आला तेव्हा ऋषभ पंत १४ आणि इशांत शर्मा ४ धावांवर खेळत होता.

यावेळी अंधूक प्रकाशामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा चांगलाच वैतागला. त्यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी एक मजेदार घटना घडली. एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसून मैदानात उपस्थित ऋषभ पंत आणि इशांत शर्मा यांच्यावर राग व्यक्त करत आहेत.

विराट कोहली आणि रोहित शर्मा त्यांच्या फलंदाजांवर चिडले कारण, शेवटच्या सत्राच्या शेवटच्या क्षणांमध्ये अंधूक प्रकाशामुळे चेंडू पाहणे कठीण होते. असे असूनही, ऋषभ पंत आणि इशांत शर्मा पंचांकडे तक्रार करत नव्हते. टीम इंडियाने तोपर्यंत ६ विकेट गमावल्या होत्या आणि अशा परिस्थितीत विराट कोहली आणि रोहित शर्माला आणखी विकेट गमावण्याची इच्छा नव्हती. त्यानंतर परिस्थिती पाहून पंचांनी पटकन त्या वेळचा खेळ संपल्याची घोषणा केली.