आर्थिक स्थैर्यासाठी क्रीडापटूंना सरकारी स्वरूपाची नोकरी मिळणे उपयुक्त असते. ही नोकरी त्यांना खेळाच्या सरावासाठी, स्पर्धासाठी वाव देणारी अशी किमान अपेक्षा असते. मात्र ऑलिम्पिक पदकाची आशा असलेला जलतरणपटू वीरधवल खाडेच्या बाबतीत मात्र नशिबाचे फासे उलटेच आहेत. त्यामुळे कुटुंबाचा, आर्थिक समीकरणांचा विचार करता मी खेळापेक्षा नोकरीला प्राधान्य दिले तर आश्चर्य वाटायला नको, असे उद्गार वीरधवलने काढले.
वीरधवल सध्या बोरिवली येथे अतिक्रमण विभागात तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. वीरधवल पुढे सांगतो, ‘‘माझी तयारी चांगली सुरू आहे, मात्र कामाची वेळ ११ ते ६ अशी असल्याने जलतरणासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. पूर्वी मी दिवसाला ८ ते ९ तास सराव करत असे. पण आता जेमतेम ५-६ तास (सकाळी ५.३० ते ८.३० व संध्याकाळी ६ ते ६.३०) एवढाच सराव करता येतो. हे मला पिछाडीवर नेणारे आहे. परंतु काम आणि जलतरण यांची सांगड घालण्याचा माझा प्रयत्न आहे. मला आशा आहे की सर्व गोष्टी जुळून येतील आणि पुढील वर्षी होणाऱ्या महत्त्वाच्या स्पर्धामध्ये मी पदक मिळवेन.’’