scorecardresearch

“दीर्घ श्वास घे आणि…”, पत्रकार धमकीप्रकरणी वीरेंद्र सेहवागचा वृद्धिमान साहाला सल्ला!

साहाच्या त्या ट्वीटला सेहवागनं ‘असं’ उत्तर दिलं आहे.

virender sehwag advises wriddhiman saha on journalist matter
वीरेंद्र सेहवाग आणि वृद्धिमान साहा

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने त्याला धमकी देणाऱ्या पत्रकाराचे नाव सांगण्यास नकार दिला आहे. आता आपल्या बिनधास्त शैलीसाठी ओळखला जाणारा वीरेंद्र सेहवाग साहाच्या समर्थनार्थ उभा राहिला आहे. सेहवाग साहाला सोशल मीडियावर धीर देताना दिसला.

साहाच्या ट्विटवर सेहवागने लिहिले, ”प्रिय वृद्धि, इतरांना त्रास देणे हा तुझा स्वभाव नाही. आपण एक अद्भुत व्यक्ती आहात, परंतु भविष्यात इतर कोणाचे असे नुकसान टाळण्यासाठी, त्याचे नाव घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. दीर्घ श्वास घ्या आणि नाव सांगून टाक.”

काय म्हणाला होता साहा?

साहा आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, ”करिअर संपवण्याइतपत कोणाचेही नुकसान करणे माझ्या स्वभावात नाही. त्यामुळे मानवतावादी आधारावर त्याच्या कुटुंबाकडे पाहता मी सध्या नाव उघड करत नाही. पण अशी पुनरावृत्ती झाली तर मी मागे हटणार नाही. ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि या प्रकरणात मदत करण्याची तयारी दर्शवली त्या सर्वांचा मी आभारी आहे.”

हेही वाचा – भारत-श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिका : जडेजाचे पुनरागमन निश्चित; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी बिश्नोई, वेंकटेश, पटेल यांचे स्थान

३७ वर्षीय साहाने २०१० मध्ये पदार्पण केल्यापासून आतापर्यंत ४० कसोटी सामने खेळले आहेत. साहाला आगामी श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी (कसोटी) वगळण्यात आले असून भविष्यात निवडीसाठी त्याचा विचार होण्याची शक्यता नाही. भारतीय संघ व्यवस्थापनाला बॅकअप यष्टीरक्षक म्हणून तरुण खेळाडू तयार करायचे आहेत.

राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीवर निशाणा

“संघ व्यवस्थापनाने मला यापुढे संघ निवडीत विचार केला जाणार नाही असं सांगितलं. जोपर्यंत मी भारतीय संघाच्या सेटअपचा भाग होतो तोपर्यंत मी हे सांगू शकत नव्हतो,” असा धक्कादायक खुलासा वृद्धिमान साहाने प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. “प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही मला निवृत्ती घेण्याबद्दल विचार करण्याचा सल्ला दिला,” असे वृद्धिमान साहाने म्हटलं आहे.

वृद्धिमान साहाने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीविरोधातही संताप व्यक्त केला. गांगुलीने आपल्याला संघातील स्थान पक्कं असून, चिंता करु नको अशा शब्द दिला होता असा दावा वृद्धिमान साहाने केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virender sehwag advises wriddhiman saha on journalist matter adn

ताज्या बातम्या