भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने इशान किशन आणि रिषभ पंत या युवा भारतीय क्रिकेटपटूंना सल्ला दिला आहे. खेळपट्टीवर ठाण मांडल्यानंतर आपली खेळी कशी वाढवावी आणि सामना कसा जिंकून द्यावा, हे या दोघांनी विराट कोहलीकडून शिकावे, असे सेहवाग म्हणाला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या आणि आपल्या पदार्पणाच्या टी-20 सामन्यात इशान किशनने दमदार खेळी करत सर्वांची वाहवा मिळवली. या सामन्यात संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद अर्धशतक करत संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यानंतर सेहवागने एका क्रीडा वृतसंस्थेला आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ”क्रिकेटचे कोणतेही स्वरूप असो, जर विराटचा दिवस असेल तर तो खेळपट्टीवर ठाण मांडून बसतो आणि सामना संपवूनच परत येतो. इशान आणि रिषभ यांनी विराटप्रमाणे खेळले पाहिजे. एकदा सेट झाल्यावर या खेळाडूंनी आपली विकेट न टाकता सामना संपेपर्यंत खेळले पाहिजे.”

सचिननेही सेहवागला दिला होता सल्ला

आपल्या कारकिर्दीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही असाच सल्ला देत असल्याचे सेहवाग म्हणाला. ”ही गोष्ट सचिनही करायचा. तो मला सांगायचा, आज जर तुमचा दिवस चांगला असेल तर जास्तीत जास्त वेळ खेळा. उद्या काय होणार हे आपल्याला माहीत नसते. म्हणून खूप धावा करून नाबाद परत या. पुढच्या सामन्यात आपण धावा करण्यास सक्षम असाल की नाही हे आपल्याला माहीत नसते. परंतू आज आपल्याला चेंडू फुटबॉलप्रमाणे दिसत असल्याने आपण चांगले खेळत असतो”, असे सेहवागने सांगितले.

इशानने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामध्ये 32 चेंडूमध्ये 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. हा सामना संपल्यानंतर इशानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तर, विराटने 5 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 73 धावांची खेळी केली.