२००७च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाच्या पराभवाबाबत माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मोठा खुलासा केला आहे. या विश्वचषकात भारतीय संघाला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. यासाठी सेहवागने संघातील प्रमुख व्यक्तीला जबाबदार धरले आहे.

टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने रोहित शर्माच्या फलंदाजीचा क्रम बदलला. त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. या रणनीतीमुळे संघाने सुमार फलंदाजी केली. सेहवागच्या मते, अशाच डावपेचांमुळे भारतीय संघाला २००७ च्या विश्वचषकात पराभवाचा सामना करावा लागला होता.

क्रिकबझवरील संभाषणात सेहवाग म्हणाला, ”२००७ च्या विश्वचषकात आम्ही दोन चुका केल्या. आम्ही आव्हानाचा पाठलाग करताना सलग १७ सामने जिंकले होते, पण विश्वचषकात आमचे प्रशिक्षक म्हणाले, की आम्हाला फलंदाजीचा सराव हवा आहे. मी त्यांना पहिले दोन सामने जिंकू द्या असे सांगितले, पण त्यांनी नकार दिला. दुसरी चूक म्हणजे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही सलामीची जोडी जबरदस्त कामगिरी करत होती, पण असे असूनही त्यात बदल करण्यात आला. तेंडुलकरने मधल्या फळीत फलंदाजी केल्यास त्याच्यावर अधिक नियंत्रण राहील, असे सांगण्यात आले. आमच्याकडे आधीच युवराज, राहुल द्रविड आणि धोनी मधल्या फळीत होते, मग मधल्या फळीत का बदलायचे.”

हेही वाचा – IND vs AFG : सुनील गावसकरांचा ‘हा’ सल्ला विराटनं ऐकला तर भारताचा विजय पक्का!

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल हे त्याकाळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. २००७ च्या विश्वचषकात भारतीय संघ दोन सामने गमावून आधीच पहिल्या फेरीतून बाहेर पडला होता आणि यावेळीही तीच परिस्थिती समोर दिसत आहे.