२००७ साली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताला बांगलादेशकडून पराभूत होत पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर व्हावे लागले. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी याने भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली आणि भारताला पहिलावहिला टी२० विश्वचषक मिळवून दिला.

त्या स्पर्धेतील यशानंतर धोनीने संघातील काही वयस्क खेळाडूंना फॉर्म आणि तंदुरुस्ती या दोन मुद्द्यांवर संघाबाहेर ठेवण्याची बीसीसीयाला विनंती केली. त्यानुसार सुमार कामगिरी करणाऱ्या वीरेंद्र सेहवागला संघातून बाहेर व्हावे लागले होते आणि धोनी व सेहवाग यांच्यात आलबेल नाही, अशा बातम्या झळकल्या.

याच मुद्द्याला धरून आज सेहवागने आपल्या एका चाहत्याला चांगलेच सुनावले. महेंद्र सिंग धोनी याचा आज वाढदिवस असल्याने फेसबुकवर आणि इतर सोशल माध्यमांवर त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. त्यातच एका युझरने वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करताना धोनीचा उल्लेख ‘सेहवागची कारकीर्द संपवणारा’ असा केला होता. या कमेंटवर लोकांनी मिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

पण महत्वाचे म्हणजे सेहवागने स्वतः या कमेंटची दखल घेत त्या चाहत्यांची कानउघाडणी केली. ‘तू जे म्हणतो आहेस, ते चुकीचे आहे’, असे सेहवागने त्या चाहत्यांच्या कमेंटला उत्तर देताना स्पष्ट केले. सेहवागच्या त्या उत्तराला आधीच्या कमेंटपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले.