Virender Sehwag on Suryakumar Yadav: शुक्रवारी मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या वन डेत सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक झळकावले आणि भारताला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. सूर्याच्या फलंदाजीचे सर्वस्तरात कौतुक झाले. विश्वचषक २०२३च्या संघात सूर्यकुमार यादवची निवड करण्याच्या भारताच्या निर्णयाचे वीरेंद्र सेहवागने कौतुक केले. मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादवने कारकिर्दीतील तिसरे एकदिवसीय अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या या खेळीसह सूर्यकुमारने १९ महिन्यांचा वन डेतील धावांचा दुष्काळही संपवला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सूर्या शॉन अॅबॉटचा बळी ठरला, मात्र तोपर्यंत त्याने भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले होते. सेहवाग म्हणाला, 'सूर्यामध्ये विरोधी संघात भीती निर्माण करण्याची क्षमता आहे' सूर्याच्या खेळीचे कौतुक करताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, “या खेळाडूमध्ये टॉप गियरमध्ये खेळण्याची आणि विरोधी खेळाडूंना त्याच्यासमोर गुडघे टेकवण्याची क्षमता आहे.” सेहवागने सूर्याविषयी ट्वीटरवर लिहिले, “सूर्यकुमार यादवच्या या अर्धशतकी खेळीने मी खूप आनंदी झालो आहे. भारतीय संघासाठी तो नक्कीच एक्स फॅक्टर आहे. सूर्या ज्या गियरमध्ये खेळतो तशी आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता फारशा खेळाडूंमध्ये नसते. त्याच्याकडे प्रतिस्पर्ध्यांना हादरवून सोडण्याची फलंदाजी आहे आणि त्याने ते टी२० मध्ये सिद्ध केले आहे. आम्ही त्याच्यावर विश्वास दाखवला असून टीम इंडियासाठी तो एक अॅसेट असेल. भारताचे अभिनंदन!" संजय मांजरेकर यांनी स्वीप शॉट्स टाळल्याबद्दल सूर्याचे कौतुक केले आणखी एक माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी स्वीप शॉट्स खेळण्याचा मोह टाळल्याबद्दल सूर्यकुमारचे कौतुक केले. मांजरेकर यांनी लिहिले, “आजच्या सामन्यात भारतासाठी SKY नावाचा आणखी एक महत्त्वाचा बॉक्स टिक झाला आहे. सूर्याने संपूर्ण डावात एकही स्वीप शॉट खेळला नाही, जे ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये नाव कमावण्याच्या त्याच्या निर्धाराचे एक उदाहरण आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेले अर्धशतक टीम इंडिया आणि त्याच्यासाठी खूप आत्मविश्वास देणारे असेल.” हेही वाचा: Asian Games Opening Ceremony: आशियाई क्रीडा स्पर्धेला आजपासून होणार सुरुवात! कुठे पाहायला मिळणार उद्घाटन सोहळा? जाणून घ्या सूर्यकुमारने के.एल. राहुलसोबत पाचव्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. राहुल ५८ धावा करून नाबाद राहिला तर सूर्या ५० धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी २७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते ते टीम इंडियाने ५ गडी आणि ८ चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. ३१ वर्षीय सूर्यकुमार यादवने आतापर्यंत २८ एकदिवसीय सामन्यांमध्ये २५.५२च्या सरासरीने आणि १०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ५८७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे. याआधी सूर्यकुमारवर वन डे फॉरमॅटमधील खराब कामगिरीमुळे टीका झाली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात सूर्याने अर्धशतक झळकावून विश्वचषकापूर्वी भारताच्या आशा उंचावल्या आहेत.