Vishwajit Ramchandra More Wins Silver Under 23 World Championship: भारताचा कुस्तीपटू विश्वजित रामचंद्र मोरेने गुरुवारी अंडर-२३ जागतिक कुस्ती स्पर्धेत इतिहास घडवला. पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत जॉर्जियाच्या कोबा कारुमिद्झेकडून १२-१३ असा निसटता पराभव झाल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. मात्र, या कामगिरीसह अंडर-२३ जागतिक कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन प्रकारात रौप्यपदक जिंकणारा विश्वजित हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला.
विश्वजित सुवर्णपदक जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. मात्र, अखेरच्या काही सेकंदांत कारुमिद्झेने आघाडी घेत विजेतेपदावर नाव कोरलं. अंतिम फेरीत पोहोचून विश्वजितने यापूर्वीच इतिहास घडवला होता. अंडर-२३ जागतिक कुस्ती स्पर्धेच्या ग्रीको-रोमन प्रकारात अंतिम फेरी गाठणारा तो पहिला भारतीय ठरला होता.
यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या विश्वजितने यंदाच्या मोहिमेची सुरुवात मेक्सिकोच्या आयझॅक मारिन माताविरुद्ध १०-८ अशा निसटत्या विजयाने केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्याने २० वर्षांखालील गटातील विद्यमान जागतिक विजेता इराणच्या आर्मिन शम्सीपूरचा ८-१ असा पराभव केला. या लढतीत विश्वजितने चार गुण मिळवून देणारा थ्रो केला. यादरम्यान शम्सीपूरच्या खांद्याला दुखापत झाल्याचंही दिसून आलं.
उपांत्य फेरीत विश्वजितने रशियाच्या मलिक गिगिएव्हला ७-४ असं नमवत अंतिम फेरीत धडक मारली. हा सामनाही चुरशीचा झाला. दुसरीकडे, कोबा कारुमिद्झेने उपांत्य फेरीत किर्गिस्तानच्या बार्सबेक असनकोझोएव्हचा पराभव करत अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं होतं. अंडर-२३ जागतिक कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन प्रकारात भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देण्याची संधी विश्वजित मोरेकडे होती. मात्र, अंतिम फेरीत झालेल्या निसटत्या पराभवामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. या पदकासह विश्वजितने या स्पर्धेतील आपल्या दोन कांस्यपदकांच्या कामगिरीत आणखी एका पदकाची भर घातली.
भारतीय कुस्तीपटूंची कांस्यपदकासाठीची लढत कायम
महिलांच्या गटात कोमलला उपांत्य फेरीत युक्रेनच्या अलिना फिलिपोविचकडून तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारे पराभव पत्करावा लागला. मात्र, तिची कांस्यपदक जिंकण्याची संधी अद्याप कायम आहे. ६८ किलो वजनी गटात दीक्षा मलिकही कांस्यपदकाच्या शर्यतीत आहे. दुसरीकडे, मानसी लाठरचं आव्हान संपुष्टात आलं.
उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या लॉरा गोडिनोकडून तिला ९-१० असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या अन्य ग्रीको-रोमन कुस्तीपटूंना मात्र पदकाच्या फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. चेतनला ६३ किलो वजनी गटातील उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला, तर ८७ किलो वजनी गटात करण कंबोजला पात्रता फेरीत तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारे पराभवाचा सामना करावा लागला.
