उलानबटार : आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत अखेरच्या दिवशी शुक्रवारी पुरुष गटात भारताच्या विश्वनाथ सुरेश (५० किलो) याने विजय मिळवून भारताच्या मोहिमेची ‘सुवर्ण’ सांगता केली. अंतिम सामन्यात विश्वनाथने जपानच्या दाइची इवाईचा ५-० अशा एकतर्फी वर्चस्वासह पराभव केला. सचिनला (६० किलो) अटीतटीच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारताने एकूण पाच सुवर्ण, स्पर्धेत सर्वाधिक १५ पदकांची कमाई केली. मात्र, कझाकस्तानच्या सर्वाधिक सहा सुवर्ण पदकांमुळे भारताला पदकतालिकेत दुसर्या क्रमांकावर राहावे लागले. भारतासाठी हे यश ऐतिहासिक ठरले. महिला खेळाडूंचे यश हे भारताच्या कामगिरीचे वैशिष्ट्य ठरले. भारतीय महिला बॉक्सिंगपटूंनी चार सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण १० पदके मिळवली.
विश्वनाथचे हे सुवर्णपदक त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. राष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली मोहोर उमटवली आहे. मंगोलिया येथे झालेल्या या स्पर्धेतील त्याची मोहीम विशेष प्रभावी ठरली. अंतिम फेरी गाठताना त्याने जगातील पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूला पराभूत करून आपली गुणवत्ता आणि कौशल्य सिद्ध केले. अंतिम फेरीतही त्याने निर्विवाद वर्चस्व राखले.
