नवी दिल्ली : युवा भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदच्या खेळातील वेग काहीसा मंदावलेला असला, तरी तो कँडिडेट्स स्पर्धेच्या आव्हानासाठी मानसिकदृष्ट्या सज्ज आहे, असे मत भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने व्यक्त केले आहे.
सायप्रसमध्ये २८ मार्चपासून सुरू होणार्या कँडिडेट्स स्पर्धेत आठ दिग्गज खेळाडू विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडतील. या स्पर्धेचा विजेता खेळाडू या वर्षाच्या अखेरीस विद्यमान विश्वविजेता दोम्माराजू गुकेशला जागतिक विजेतेपदासाठी आव्हान देण्यास पात्र ठरेल.
जागतिक संघटनेचा उपाध्यक्ष देखील असलेल्या आनंदने प्रज्ञानंदची मानसिक तयारी भक्कम असून, स्पर्धेत त्याला फॅबियानो कारुआना आणि हिकारू नाकामुरा यांसारख्या खेळाडूंकडून कडवे आव्हान मिळेल. गुकेशचा आव्हानवीर कोण ठरणार याविषयी भाकीत करणे कठीण असल्याचेही नमूद केले.
‘‘अनेक खेळाडूंनी लक्ष वेधून घेतले आहे. प्रज्ञानंद अनुभवी आहे. गेल्या काही महिन्यांत त्याचा वेग थोडा कमी झाला आहे, पण कदाचित मानसिकदृष्ट्या तो आता शिखरावर पोहोचला असून कँडिडेट्स स्पर्धेसाठी सज्ज होत आहे,’’ असे आनंद म्हणाला. आव्हानवीराविषयी थेट भाष्य करण्यास आनंद यांनी नकार दिला असला, तरी कारुआना, नाकामुरा आणि अनिश गिरी यांच्यापैकी एकाला स्पर्धा जिंकण्याची मोठी संधी असल्याचे सांगितले.
आखाती देशांमधील संघर्षामुळे सायप्रस हे ठिकाण चर्चेत आले आहे. ‘फिडे’ महिला कँडिडेट्स स्पर्धेत तीन भारतीय महिला खेळाडू सहभागी होणार असून, त्या विद्यमान विजेती जू वेन्जुनला जागतिक जेतेपदासाठी आव्हान देतील. अर्थात, तीन भारतीय खेळाडूंपैकी एक कोनेरू हम्पी आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव स्पर्धेतून माघार घेण्याचा विचार करत आहे. हम्पीसह महिला विश्वचषक विजेती दिव्या देशमुख आणि प्रज्ञानंदची बहीण आर. वैशालीही कँडिडेट्स स्पर्धेत सहभाग नोंदवतील. तीन स्पर्धक सहभाग नोंदवित असल्याने भारताला चांगली संधीही आहे.
‘‘फिडे प्रथम दर्जेदार ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करते आणि मला वाटते की आम्ही त्यात यशस्वी झालो आहोत. सायप्रस हे एक अतिशय चांगले ठिकाण असेल आणि तिथले वातावरणही अप्रतिम असेल. आम्ही खेळाडूंना सर्व माहिती देत आहोत. शेवटी ही एक स्पर्धा आहे, एकदा तुम्हाला कुठे आणि कधी जायचे आहे हे समजले की तुमची मानसिकता तयार होते. सर्व काही चार महिने आधीच निश्चित झाले आहे आणि मी या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहे,’’ असे आनंदने स्पष्ट केले.
