भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंदला जागतिक आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेतील बाराव्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने त्याला हरविले.
नाकामुराला पहिल्या अकरा फेऱ्यांमध्ये केवळ एकच विजय मिळविता आला होता. बाराव्या फेरीत त्याने आनंदविरुद्ध सुरेख डावपेच करीत यश खेचून आणले. बाराव्या फेरीअखेर त्याचे साडेपाच गुण झाले आहेत तर आनंद हा साडेसहा गुणांवरच राहिला आहे. या स्पर्धेत अव्वल स्थान घेण्यासाठी आनंदला उर्वरित शेवटच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. त्याला तेराव्या फेरीत अनिष गिरी याच्याशी खेळावे लागणार आहे तर शेवटच्या फेरीत त्याच्यापुढे पीटर स्विडलरचे आव्हान असेल. आनंदने नाकामुराविरुद्ध इंग्लिश ओपनिंगचा उपयोग केला. दहाव्या फेरीत त्याला याच तंत्रात फॅबिआनो कारुआना याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. नाकामुराने सुरुवातीपासून डावावर नियंत्रण मिळविले होते. त्याने अवघ्या २८ चालींमध्ये हा डाव जिंकला.