भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदने तुल्यबळ खेळाडू व्लादिमीर क्रामनिकला बरोबरीत रोखले आणि झुरीच क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत समाधानकारक कामगिरी केली. अमेरिकेचा खेळाडू हिकारू नाकामुरा याने अग्रमानांकित फॅबिआनो कारुआना याच्यावर मात करीत अनपेक्षित धक्का दिला. त्याने दोन गुणांसह आघाडी घेतली आहे. लिवॉन अरोनियन याने सर्जी कर्जाकिन याला बरोबरीत रोखले.  क्रामनिक हा डिसेंबरनंतर प्रथमच मोठय़ा स्पर्धेत भाग घेत आहे. मात्र त्याच्याविरुद्ध पांढऱ्या मोहरा असूनही आनंदला अपेक्षेइतका लाभ घेता आला नाही. क्वीन्स गॅम्बिटच्या या डावात क्रामनिकने आनंदला डावपेच करण्यासाठी फारशी संधी दिली नाही. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे मोहरे घेण्यावर भर दिला. ४७ व्या चालीस दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली.