१६ वर्षीय बेंजामीन ग्लेडूराकडून पराभव
पाच वेळा विश्वविजेतेपदाचा मानकरी ठरलेल्या विश्वनाथन आनंदला मंगळवारी मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. जिब्राल्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पध्रेत हंगेरीच्या १६ वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर बेंजामीन ग्लेडूराकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. सातव्या फेरीतील या पराभवामुळे आनंदच्या जेतेपदाच्या आशा मावळल्या आहेत. स्लेव्ह बचावतंत्राने सामन्याची सुरुवात करणाऱ्या आनंदने एका मागोमाग केलेल्या चुकांचा फायदा उचलत ग्लेडुराने ४९व्या चालीत विजय निश्चित केला. सातव्या फेरीअखेरीस आनंदच्या खात्यात ४ गुण जमा झाले असून तो ७६व्या स्थानावर आहे.
स्पेनचा २० वर्षीय ग्रँड मास्टर डेव्हिड अँटोन गुईज्जारोने हंगरीच्या रिचर्ड रॅपोर्टचा पराभव करून सहा गुणांसह अव्वल स्थानावर पकड घेतली आहे. ५.५ गुणांसह १५ खेळाडू दुसऱ्या स्थानावर आहेत. यामध्ये भारताच्या पी. हरिकृष्णा, अभिजित गुप्ता, विदीत गुजराथी आणि एस.पी. सेथुरमन यांचा समावेश आहे. तसेच फ्रान्सचा मॅक्सिमे व्हॅचिएर-लँग्रेव्हे, पोलंडचा रॅडोस्लेव्ह वोज्टाझेक, चीनचा नी हुआ यांच्यासह आठ खेळाडू संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.