प्रो-कबड्डीचा पाचवा हंगाम यंदा अधिकचं रंगणार आहे. याला कारण ठरलंय अंतिम सामन्यात विजेत्या संघाला मिळणारं इनाम. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रो-कबड्डीच्या बक्षिसांच्या रकमेत घसघशीत वाढ होताना दिसतेय. या पर्वात एकूण मिळून तब्बल ८ कोटींची बक्षिसं दिली जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा या रकमेत २ कोटींची वाढ झाली आहे.

दिवसेंदिवस प्रो-कबड्डीला मिळणारी प्रसिद्धी पाहता अनेक मोठमोठ्या कंपन्या या स्पर्धेशी जोडल्या जातायत. यंदा चायनीज स्मार्टफोन कंपनी Vivo ने प्रो-कबड्डीच्या मुख्य प्रायोजकत्वाचे अधिकार मिळवले आहेत. त्यामुळेच यंदाच्या बक्षिसांच्या रकमेत घसघशीत वाढ होताना दिसतेय. यंदा विजेत्या संघाला ३ कोटी तर उपविजेत्या संघाला १.८ कोटीचं बक्षिस मिळणार आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संघाला १.२ कोटींचं बक्षिस मिळणार आहे. याव्यतिरीक्त प्रो-कबड्डीच्या यंदाच्या पर्वात अनुप कुमार, मनजीत चिल्लर यांच्या मानधनातही चांगलीच वाढ झालेली आहे.

मुख्य बक्षिसांव्यतिरीक्त प्रत्येक सामन्यात मिळणाऱ्या बक्षिसांमधूनही खेळाडूंना लखपती बनण्याची संधी मिळणार आहे.

मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर – १५ लाख
सर्वोत्कृष्ठ चढाईपटू – १० लाख
सर्वोत्कृष्ठ बचावपटू – १० लाख
सर्वोत्कृष्ठ तरुण खेळाडू – ८ लाख

प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाची सुरुवात २८ जुलैपासून होणार असून सलामीचा सामना तेलगु टायटन्स आणि यंदाचा नवोदीत संघ तामिळ थलायवाज यांच्यात होणार आहे.