VVS Laxman On Vaibhav Sooryavanshi: भारताचा युवा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौऱ्यावर पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. पण या मालिकेत त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यासाठीही त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला आणि २ अर्धशतकं झळकावली. यासह त्याने भारत – झिम्बाब्वे मालिकेत मालिकावीर पुरस्काराचा मान पटकावला. या मालिकेतील पहिलं अर्धशतकं झळकावताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. त्यानंतर त्याने आणखी एक अर्धशतक झळकावलं. यासह तो वयाच्या १५ वर्षी २ अर्धशतकं झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला. वैभव इथून पुढे २० ते २५ वर्ष भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करु शकतो. सध्या तो केवळ टी-२० संघाचा भाग आहे. पण भविष्यात तो वनडे आणि कसोटी संघाचं प्रतिनिधित्व करतानाही दिसू शकतो. दरम्यान भारताचे मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलं आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिका झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले, “एक गोष्ट जी मला वाटते की त्याने सुधारणा करायला हवी, ती म्हणजे त्याची फिटनेस. तो खूप लहान आहे. तो आपल्या खेळात आणखी सुधारणा कशी करता येईल, याच प्रयत्नात असतो. आजही क्षेत्ररक्षण करत असताना, त्याला दुखापत झाली होती. तरीदेखील त्याला मैदानावर थांबायचं होतं. आमच्या फिजिओनेच त्याला बाहेर जायला सांगितलं. संघासाठी शक्य होईल त्या मार्गाने योगदान देण्याची त्याची हीच उत्सुकता आणि जिद्द आहे.”
पत्रकार परिषदेत वैभवच्या कामगिरीबाबत प्रश्न विचारला असता व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले की, “हे अपेक्षेनुसारच होतं. गेल्या वर्षी, त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दबावाचा सामना करुन जी खेळी केली होती ती अप्रतिम होती. माझं तर हेच म्हणणं आहे की, आयपीएल स्पर्धेतील सामना हा आंतरराष्ट्रीय दर्जेचाच असतो. १४ किंवा १५ वर्षांच्या वयात, जेव्हा तुम्ही आयपीएलमध्ये खेळत असता , तेव्हा एकतर या मोठ्या संधीमुळे तुम्ही दबावात येऊ शकता किंवा मग त्या दबावाचा स्वीकार करु शकता. वैभवने दुसरा पर्याय निवडला. मला खात्री आहे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वच रेकॉर्ड मोडून काढेल.”
इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात वैभवला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. या मालिकेतील ३ सामन्यांमध्ये तो एकही मोठी खेळी करु शकला नव्हता. पण झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने दमदार पुनरागमन केलं. या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने ५० धावांची खेळी केली. तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना त्याने ताबडतोड २० धावांची खेळी केली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने ८१ धावा चोपल्या. या डावात त्याला शतक झळकावण्याची संधी होती. पण त्याची ही संधी थोडक्यात हुकली. पण त्याने मालिकावीर पुरस्कारावर नाव कोरलं.
