बंगळूरु : भारतीय क्रिकेटपटूंना वारंवार होणार्या दुखापतींसाठी केवळ ‘बीसीसीआय’च्या सेंटर ऑफ एक्सलन्सला (सीओई) जबाबदार धरणे योग्य नाही. खेळाडू म्हणजे यंत्र नव्हे. त्यांना दुखापती होणार आणि पुन्हा तंदुरुस्त होण्यासाठी वेळही लागणार. दुखापतीतून सावरण्यासाठी निश्चित केलेली कालमर्यादा प्रत्येक वेळी पाळली जाईलच असे नाही. त्यामुळे आम्हाला दोष देणे योग्य नाही, असे वक्तव्य ‘सीओई’चा प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण याने केले.
गेल्या काही काळात भारतीय क्रिकेटपटूंच्या दुखापतींचे प्रमाण वाढले आहे. त्यातच दुखापतीतून सावरलेल्या खेळाडूंना मैदानात परतण्यासाठी ‘सीओई’तील डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर तेच खेळाडू पुन्हा जायबंदी झाल्याचेही प्रकार घडले आहे. त्यामुळे ‘सीओई’च्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर, ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष मिथुन मन्हास आणि सचिव देवजित सैकिया यांनी बंगळूरुतील ‘सीओई’ला भेट दिली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लक्ष्मणने ‘सीओई’ची भूमिका, खेळाडू जायबंदी झाल्यानंतर त्याला पुन्हा तंदुरुस्त करण्यापर्यंतची एकंदर प्रक्रिया यावर प्रकाश टाकला.
दुखापतींच्या व्यवस्थापनाबाबत ‘सीओई’, संघ व्यवस्थापन, क्रीडा विज्ञान आणि वैद्यकशास्त्र विभाग, तसेच निवड समिती यांच्यात सातत्याने आणि सुरळीत समन्वय सुरू असल्याचे लक्ष्मण यांनी स्पष्ट केले. खेळाडूच्या पुनर्वसनातील प्रत्येक टप्प्याची माहिती संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला दिली जाते, असे तो म्हणाला.
जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर आणि साई सुदर्शन यांच्यासह अन्यही बरेच खेळाडू सध्या ‘सीओई’मध्ये दुखापतीतून सावरण्याच्या प्रक्रियेत आहेत. खेळाडूंच्या पुनर्वसनाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने ‘सीओई’वर टीका होत आहे. मात्र, लक्ष्मणने ही टीका फेटाळून लावली.
खेळाडूच्या दुखापतीनंतर काही मार्गदर्शक तत्त्वे आणि कालमर्यादा निश्चित केली जाते. मात्र, मानवी शरीर यंत्र नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी ठरलेली वेळ पाळली जाईलच असे नाही. काही खेळाडूंना दुखापतीतून सावरण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. हे स्वाभाविकच आहे. खेळाडूची प्रगती पाहून त्यावरील भार टप्प्याटप्प्याने वाढवला जातो, असे लक्ष्मण यांनी स्पष्ट केले.
सर्वांशी योग्य संवाद
’ श्रीलंकेविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी २८ जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या प्राथमिक संघात जसप्रीत बुमरा आणि साई सुदर्शन यांना स्थान देण्यात आले होते. मात्र, त्यांची अंतिम निवड तंदुरुस्तीवर आधारित असल्याचे सांगण्यात आले होते.
’ निर्धारित वेळेत या दोघांनाही ‘सीओई’तील डॉक्टरांकडून खेळण्यासाठी मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे अखेर त्यांना संघाबाहेर पडावे लागले.
या दोघांचे उदाहरण देऊन लक्ष्मण यांनी निवड प्रक्रियाही समजावून सांगितली. निवड समिती ‘सीओई’कडून तंदुरुस्ती अहवाल मागवते
आणि त्यानुसार खेळाडूच्या उपलब्धतेबाबत निर्णय घेतला जातो, असे लक्ष्मण म्हणाला.
’ ‘‘जर पुनर्वसनाची प्रगती अपेक्षेपेक्षा संथ असेल, तर निवड समितीचे अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षकांना तातडीने त्याची माहिती दिली जाते. त्यांच्याशी योग्य संवाद साधला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळण्यासाठी खेळाडू तयार नसल्यास त्याबाबत सर्वांना माहिती असते,’’ असे लक्ष्मणने स्पष्ट केले.
निकष पूर्ण झाल्याशिवाय ‘फिट’ घोषित नाही
खेळाडूला पुन्हा मैदानात पाठवण्यापूर्वी त्याची वैद्यकीय, शारीरिक आणि कौशल्यात्मक क्षमता विविध टप्प्यांवर तपासली जाते. खेळाडूला ‘सीओई’मधून मुक्त करण्यापूर्वी काही निश्चित तंदुरुस्त निकष पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे लक्ष्मणने सांगितले. ‘‘क्रीडा विज्ञान आणि वैद्यकशास्त्र विभाग, तसेच स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रक्रियेत निश्चित केलेले निकष खेळाडूला पूर्ण करावेच लागतात. संघात परतल्यानंतर पहिल्याच सामन्यापासून त्याने आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करावी, हा त्यामागचा उद्देश आहे,’’ असे लक्ष्मण म्हणाला.
सीओई हे केवळ पुनर्वसन केंद्र नाही. खेळाडूंना सर्वोच्च पातळीवर कामगिरी करण्यास सक्षम बनवणे ही ‘सीओई’ची मुख्य भूमिका आहे.त्यामुळे दुखापतीसाठी कोणाला दोषी ठरवणे योग्य नाही. – व्हीव्हीएस लक्ष्मण, ‘सीओई’चा प्रमुख
