VVS Laxman As Director Of Cricket: भारतीय क्रिकेटमध्ये येत्या काही दिवसात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. भारतीय संघाचे माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण काही दिवसांपू्र्वी गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या मुख्यप्रशिक्षकाची भूमिका पार पाडताना दिसून आले होते. यासह बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसचा प्रमुख देखील आहेत. माध्यमातील वृ्त्तानुसार, व्हीव्हीएस लक्ष्मण यांची बीसीसीआयचा ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’पदी निवड केली जाऊ शकते.

भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा कार्यकाळ येत्या काही दिवसांत समाप्त होणार आहे. तसेच भारतीय संघाच्या कोचिंग सेटअपचाही आढावा घेतला जात आहे. असं असताना, बीसीसीआयच्या योजनेत व्हीव्हीएस लक्ष्मण यांचं नाव देखील आघाडीवर आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे बीसीसीआयचे डायरेक्टर ऑफ क्रिकेटची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तर मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा मुख्य निवडकर्ते पदाचा कार्यकाळ जून २०२७ पर्यंत वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे बीसीसीआय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

याआधी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसची जबाबदारी राहुल द्रविड यांच्याकडे होती. त्यानंतर राहुल द्रविड यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे सोपवण्यात आली. इथे ते युवा खेळाडूंना घडवण्याचं काम करत आहेत. जर त्यांच्याकडे डायरेक्टर ऑफ क्रिकेटची जबाबदारी सोपवण्यात आली, तर त्यांच्या जबाबदारीत आणखी वाढ होणार आहे. पण याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण येत्या काही दिवसात याबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे.

व्हीव्हीएस लक्ष्मणची कारकिर्द

व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय कसोटी संघातील सर्वात विश्वासू फलंदाजांपैकी एक होते. त्यांना भारतीय संघासाठी १३४ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांनी ४६.० च्या सरासरीने ८७८१ धावा केल्या. यादरम्यान त्यांनी १७ शतकं आणि ५६ अर्धशतकं झळकावली. तर २८१ धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी ठरली. तर ८६ वनडे सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्यांनी ३०.८ च्या सरासरीने २३३८ धावा केल्या. यादरम्यान त्यांनी ६ शतकं आणि १० अर्धशतकं झळकावली. तर आयपीएल स्पर्धेतील २० सामन्यांमध्ये त्यांनी २८२ धावा केल्या.