भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पुन्हा एकदा दोन प्रशिक्षक वापरण्याच्या तयारीत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिका आणि इंग्लंड दौऱ्यासाठी निवडकर्ते वेगवेगळे संघ निवडू शकतात. दोन्ही संघांसाठी वेगवेगळे प्रशिक्षकही असू शकतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ही जबाबदारी मिळू शकते. नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड मुख्य संघासोबत इंग्लंडला जाणार आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण यांची जूनच्या अखेरीस आयर्लंड दौऱ्यासाठी भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. भारत आयर्लंडमध्ये दोन टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, लक्ष्मणला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तसेच आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यांसाठी ही जबाबदारी दिली जाऊ शकते. २२ किंवा २३ मे रोजी टीम इंडियाची निवड होऊ शकते. इंग्लंडमध्ये मुख्य संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी शिखर धवनकडे जवाबदारी सोपवली जाऊ शकते. यापूर्वी राहुल द्रविडला गतवर्षी श्रीलंका दौऱ्यासाठी काळजीवाहू प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तेव्हा प्रमुख रवी शास्त्री टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर होते. त्यानंतर धवनने श्रीलंकेचे नेतृत्व केले.

भारतीय संघ इंग्लंडमध्ये सराव सामना खेळणार

बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ २४ ते २७ जून दरम्यान लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. राहुल द्रविड १५ किंवा १६ जूनला आपल्या संघासह इंग्लंडला रवाना होणार आहे. यासाठी बोर्डाने लक्ष्मण यांच्याकडे कोचिंगसाठी संपर्क साधला आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा सामना बर्मिंगहॅम येथे १ ते ५ जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये टीम इंडियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. करोनामुळे पाचवी कसोटी पुढे ढकलण्यात आली होती.

लक्ष्मण यांना कोचिंगचा अनुभव

माजी फलंदाज लक्ष्मण सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत. गेल्या वर्षाच्या अखेरीस राहुल द्रविड बाहेर पडल्यानंतर त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाले. लक्ष्मण यांना कोचिंगचा अनुभव आहे. ते आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या प्रशिक्षक संघाचा एक भाग होते. ते बंगालच्या देशांतर्गत संघाचा फलंदाजी सल्लागारही राहिले आहेत. याशिवाय लक्ष्मण या वर्षाच्या सुरुवातीला अंडर-१९ विश्वचषकादरम्यान स्पोर्ट्स स्टाफचा सदस्य होते.