नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ‘आयसीसी’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील निराशाजनक मोहिमेनंतर मुख्य प्रशिक्षक रमेश पोवारचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. याचप्रमाणे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख (एनसीए) व्हीव्हीएस लक्ष्मण महिला क्रिकेटमधील भावी पिढी घडवण्याच्या दृष्टीने प्रेरकाची जबाबदारी स्वीकारण्याची दाट शक्यता आहे.
महिला विश्वचषक स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर अनेक बदल अपेक्षित आहेत. मात्र पोवार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नियमांनुसार पुन्हा मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करू शकतो. डब्ल्यूव्ही रामन यांच्या जागी पोवारची नियुक्ती करण्यात आली होती. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाने २०२०मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. ‘‘पोवारचा कार्यकाळ विश्वचषक स्पर्धेपर्यंतच होता. हा कार्यकाळ वाढवला जाऊ शकत नाही. त्यामुळे निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. पोवार पुन्हा पदासाठी अर्ज करू शकतो आणि क्रिकेट सल्लागार समिती घटनेनुसार यावर निर्णय घेऊ शकते,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले. कर्णधार मिताली राजशी वाद झाल्यानंतरही रामन यांना डावलून पोवारकडे प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली. ‘‘रामन यांच्यापेक्षा पोवारने चांगली कामगिरी केली का, याबाबत सल्लागार समिती निर्णय घेईल. ‘बीसीसीआय’ त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही,’’ असे सूत्रांनी सांगितले. भारताच्या न्यूझीलंडमधील मोहिमेच्या उत्तरार्धात दोन वरिष्ठ खेळाडूंमध्ये तीव्र मतभेद होते. पोवारने ते दूर करण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच त्यांना पुन्हा ही जबाबदारी दिली जाते का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. पोवार यांनी महिला संघाचे प्रशिक्षकपद दोन कार्यकाळ भूषवले. यापैकी दुसऱ्या कार्यकाळात पोवारच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने प्रत्येक मालिका गमावली आणि आता विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यातही अपयश आले. पुढील वर्षी १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होणार आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’ क्रिकेटपटूंची नवीन पिढी घडविण्याच्या विचारात आहे. ज्यामध्ये लक्ष्मण मोठी भूमिका पार पाडत आहे.