VVS Laxman Indian Cricket Team Head Coach BCCI Centre of Excellence: माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांचं नाव भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अनेकदा चर्चेत राहिलं आहे. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ जून २०२४ मध्ये संपल्यानंतर त्यांचं नाव पुन्हा पुढे आलं होतं, मात्र अखेरीस गौतम गंभीर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर गंभीर यांच्या नेतृत्वाखाली भारताला सलग दुसऱ्यांदा घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत व्हाईटवॉशचा सामना करावा लागल्याने लाल चेंडूतील कामगिरीवर टीका वाढली आणि स्वतंत्र कोचिंग रचनेची मागणी जोर धरू लागली. त्या वेळीही लक्ष्मण यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र आता त्यांनी याबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.
रविवारी बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण म्हणाले की, २०२३ मध्ये ते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होणार होते. त्या वेळी एकदिवसीय विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा पहिला कार्यकाळ संपणार होता. मात्र वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली नाही आणि त्यानंतर द्रविड यांचा कार्यकाळ २०२४ टी-२० विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला.
व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाच्या हेड कोच पदाबाबत नेमकं काय म्हणाले?
लक्ष्मण म्हणाले, “२०२३ मध्ये मी मुख्य प्रशिक्षक होणार होतो. पण वैयक्तिक कारणांमुळे मी ती जबाबदारी स्वीकारू शकलो नाही. मी जय शाह यांना दोन वेळा भेटून माझी कारणं सांगितली आणि त्यांनी ती समजून घेतली.”
मे २०२४ मध्ये बीसीसीआयने द्रविड यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू केला तेव्हाही लक्ष्मण यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची चर्चा होती. त्या पदासाठी ते आघाडीच्या उमेदवारांपैकी एक मानले जात होते, परंतु अखेरीस गौतम गंभीर यांची निवड झाली. दरम्यान, लक्ष्मण यांनी राष्ट्रीय संघाशी आपला संबंध कायम ठेवला आहे. त्यांनी अनेक वेळा हंगामी मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं असून, अलीकडेच झिम्बाब्वे दौऱ्यातील भारताच्या टी-२० मालिकेदरम्यानही त्यांनी ही जबाबदारी सांभाळली होती.
लक्ष्मण यांनी सांगितलं की, सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) आपला कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेताना माजी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा आणि विद्यमान सचिव देवजित सैकिया यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचा मोठा प्रभाव होता. पीटीआयच्या वृत्तानुसार लक्ष्मण म्हणाले, “जय शाह आणि बीसीसीआयने मला माझी संकल्पना अमलात आणण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं. देवजित सैकिया अजूनही तसाच पाठिंबा देत आहेत. त्यामुळे मी CoEमधील माझा कार्यकाळ दोन वर्षांनी वाढवला आणि बीसीसीआयला स्पष्ट सांगितलं की मी मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारणार नाही. २०२४ मध्ये माझ्याशी संपर्क साधण्यात आला होता, हे तुम्हाला माहितीच आहे.”
“या दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुढे जाण्यापूर्वी मी CoEची रचना, प्रक्रिया आणि प्रोटोकॉल पूर्णपणे स्थापित करेन. प्रत्येक विभागासाठी आवश्यक असलेल्या सर्व स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स (SOPs) तयार करून व्यवस्था भक्कम करूनच मी पुढे जाईन,” असं सांगत लक्ष्मण यांनी पुढील दोन वर्षांत CoEमध्ये काय उभारायचं आहे, याबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली.
