scorecardresearch

भारत-पाकिस्तान मालिकेची प्रतीक्षाच!; पाच वर्षांच्या कार्यक्रमपत्रिकेत समावेश नाही; भारत ३८ कसोटी, ४२ एकदिवसीय आणि ६१ ट्वेन्टी-२० सामने खेळणार

भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पध्र्यामध्ये पुढील सहा वर्षांत मालिका होणार नसल्याने क्रिकेटरसिकांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

भारत-पाकिस्तान मालिकेची प्रतीक्षाच!; पाच वर्षांच्या कार्यक्रमपत्रिकेत समावेश नाही; भारत ३८ कसोटी, ४२ एकदिवसीय आणि ६१ ट्वेन्टी-२० सामने खेळणार
संग्रहित

पीटीआय, नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पध्र्यामध्ये पुढील सहा वर्षांत मालिका होणार नसल्याने क्रिकेटरसिकांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या २०२३ ते २०२७ पर्यंतच्या दौरे-स्पर्धा कार्यक्रमपत्रिकेत भारत १४१ सामने खेळणार असला तरी भारत-पाकिस्तान मालिकेचा यात समावेश नाही.

‘आयसीसी’ने मे २०२३ ते एप्रिल २०२७ या पाच वर्षे कालावधीचा कार्यक्रम जाहीर केला. यात भारतीय संघ ३८ कसोटी, ४२ एकदिवसीय आणि ६१ ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेल्या राजनैतिक संबंधांमुळे ‘आयसीसी’ने या दोन देशांमध्ये मालिकेला स्थान दिलेले नाही. या कार्यक्रमात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिका तीन सामन्यांच्याच राहणार आहेत.

भारतासाठी विशेष म्हणजे आतापर्यंत चार कसोटी सामन्यांची होणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आता पाच सामन्यांची होईल. भारत १९९१नंतर प्रथमच २०२४-२५मध्ये ऑस्ट्रेलियात पाच सामन्यांची मालिका खेळेल. त्यापूर्वी भारत वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन कसोटी तसेच प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी २० सामने होतील. भारत २०२४मध्ये बांगलादेशशी मायदेशात दोन सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धची मालिकादेखील पाच सामन्यांची असेल.

सामन्यांच्या संख्येत वाढ

चालू कार्यक्रमात १२ सदस्यीय राष्ट्रांमध्ये एकूण ६९४ सामने खेळले गेले. या वेळी मात्र ही संख्या वाढली असून, नव्या कार्यक्रमपत्रिकेनुसार एकूण ७७७ आंतरराष्ट्रीय सामने होतील. यात १७३ कसोटी, २८१ एकदिवसीय आणि ३२३ ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश आहे.

सर्वाधिक कसोटी सामने इंग्लंडचे

या कार्यक्रमपत्रिकेनुसार इंग्लंड सर्वाधिक ४३ कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया (४०) आणि भारत (३८) यांचा क्रमांक लागतो. अन्य देशांमध्ये न्यूझीलंड ३२, दक्षिण आफ्रिका २९, पाकिस्तान २९, तर श्रीलंका, वेस्ट इंडिज प्रत्येकी २५ कसोटी सामने खेळणार आहे.

  विश्वचषकापूर्वी भारताचे २७ सामने

पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारत २७ एकदिवसीय सामने खेळणार आहे. याला झिम्बाब्वे दौऱ्याने सुरुवात होईल. त्यानंतर दक्षिण आफ्रिका भारतात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी भारत न्यूझीलंड दौऱ्यात तीन एकदिवसीय सामने खेळेल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.