मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) आपल्या संलग्न क्लबच्या वित्तीय स्थिरता आणि तळागाळातील क्रिकेटला मजबूत करण्यासाठी पुढील दहा वर्षांसाठी ५०० कोटींचा निधी उभारणार असल्याचे सांगितले. यासह ऐतिहासिक वानखेडे स्टेडियवरील ‘लाउंज’ना दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे आणि दिवंगत माधव मंत्री यांचे नाव देण्यात येणार आहे. हे निर्णय ‘एमसीए’च्या शुक्रवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आले.

या वर्षी एप्रिलमध्ये ‘एमसीए’च्या कार्यकारी परिषदेने सर्व संलग्न क्लबना दीर्घकालीन वित्तीय स्थिरता आणि आत्मनिर्भरता सुनिश्चित करण्यासाठी १०० कोटींचा निधी उभारण्यास मंजुरी दिली होती. मुंबईतील पायाभूत क्रिकेटला मजबूत करण्यासह क्लबच्या सुविधा सुधारणे हा निधी उभारण्यामागचा मूळ उद्देश आहे. ‘‘गेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत १०० कोटी रुपये निर्धारित करण्यात आले होते. मात्र, तळागाळातील क्रिकेट आणि क्लबसाठी यामध्ये वाढ करून ५०० कोटी रुपये करण्यात आले आहे.

क्लब याचा वापर क्रीडासाहित्य आणि अन्य सुविधांसाठी करू शकतात,’’ असे ‘एमसीए’ अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले. ‘‘आम्ही तेंडुलकर, रहाणे आणि माधव मंत्री यांच्या नावाचा एक-एक ‘लाउंज’ निर्धारित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सचिवांसह तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे,’’ असेही नाईक पुढे म्हणाले. या समितीमध्ये ‘एमसीए’चे उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड, कार्यकारी परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर आणि वकील उज्ज्वल निकम यांचा समावेश असेल.

बैठकीत हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती अमजद सय्यद यांना ‘एमसीए’चे लोकपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यासह ‘एमसीए’च्या क्रिकेट समितीचा कार्यकाळही वाढविण्यात आला आहे. या समितीमध्ये राजू कुलकर्णी अध्यक्ष, तर संगीता काटवारे आणि प्रीती डिमरी सदस्य आहेत.