दक्षिण कोरियातील आशियाई क्रीडा स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये कांस्यपदक मिळविल्यानंतर माझ्यावर अभिनंदनाचा भरपूर वर्षांव झाला, पण मला मात्र सर्वात जास्त ओढ होती घरची. गेले दोन वर्षे राष्ट्रीय शिबिरामुळे मी घरी गेलेली नाही. त्यामुळे आईवडिलांच्या शाबासकीची मला उत्सुकता होती, असे महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर हिने सांगितले.
ललिता ही सातारा जिल्ह्य़ातील शिखर शिंगणापूरजवळील मोही या खेडेगावातील रहिवासी आहे. आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळाल्याबद्दल महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेतर्फे तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी ललिता म्हणाली, ‘‘विविध स्पर्धा व राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर यामुळे मी दोन वर्षे घरी गेलेली नाही. नोव्हेंबरमध्ये पुन्हा आमचे शिबिर सुरू झाले की मी पुन्हा रिओ ऑलिम्पिक होईपर्यंत घरी जाऊ शकणार नाही. आमचे रशियन प्रशिक्षक निकोलाय यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला केवळ सात-आठ महिनेच फायदा झाला. २०१०च्या आशियाई स्पर्धेनंतर गेली चार वर्षे त्यांची नियुक्ती झालेली नव्हती. आठ महिन्यांपूर्वी आमच्यासाठी पुन्हा त्यांना पाचारण करण्यात आले. दोन वर्षे त्यांचे मार्गदर्शन मिळाले असते तर कदाचित मी सोनेरी कामगिरी करू शकले असते. आखाती देशांमध्ये आफ्रिकन देशांमधून खेळाडू आयात केले जातात अन्यथा लांब अंतराच्या शर्यतीत भारतीय धावपटूंचेच वर्चस्व राहील.’’
ती पुढे म्हणाली, ‘‘शासनाने स्पर्धेपूर्वी मला प्रशिक्षणासाठी पाच लाख रुपयांचा निधी दिला त्याचा फायदा झाला. स्पर्धेपूर्वी आम्ही इन्चॉन येथील वातावरणाशी अनुकुलता व्हावी म्हणून लवकर गेलो होतो. त्यामुळेच आमची कामगिरी चांगली झाली. स्टीपलचेस शर्यतीच्या निर्णयाबाबत भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने अपील केले आहे. हा निर्णय आमच्या बाजूने लागला तर मला खूप आनंद होईल. कारण मला रौप्य व सुधाला कांस्यपदक मिळेल.’’