भारताविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. स्टीव्हन स्मिथला दुखापत झाल्यामुळे हा बदल अपेक्षित आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेला १२ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या मालिकेत पाच एकदिवसीय व तीन ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश आहे. स्मिथला गुडघे व मांडीतील स्नायूंच्या दुखापतीने ग्रासले आहे. तो सध्या विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाचे नेतृत्व करीत आहे, परंतु वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
मार्चमध्ये भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीही स्मिथकडेच संघाचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊनच त्याच्यावर शारीरिक ओझे न देता त्याला काही दिवस विश्रांती देण्याबाबत ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापन विचार करीत आहे.