IND vs SA Washington Sundar David Miller Fight Video: दक्षिण आफ्रिकेने उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर २०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारताला पराभवाचा धक्का दिला. टी-२० विश्वचषकातील हा भारताचा पहिला पराभव आहे. या महत्त्वाच्या सुपर-८ सामन्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले आणि ज्यामुळे टीम इंडियाला ७६ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. डेविह मिलर द. आफ्रिकेच्या विजयाचा हिरो ठरला. पण या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर व डेविड मिलर यांच्यात वाद पाहायला मिळाला.

रविवारी झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० विश्वचषक २०२६ सामन्यात वॉशिंग्टन सुंदर आणि डेव्हिड मिलर यांच्यात मैदानावरील वाद घालतानाचा व्हीडिओ समोर आला आहे. पहिल्या डावात सुंदरने आपल्या स्पेलमधील दुसरं षटक पूर्ण केल्यानंतर ही घटना घडली. मिलर दुसऱ्या टोकावरून धावत येत सुंदरशी बोलायला आला आणि दोघं वाद घालताना दिसले.

सुंदर-मिलरमध्ये कशावरून झाला वाद?

ही घटना दक्षिण आफ्रिकेच्या डावातील १४व्या षटकात घडली. सुंदरला असं वाटलं की, मिलर चेंडू टाकण्यापूर्वीच धाव घेण्यासाठी क्रीज सोडत होता, त्यामुळे तो नाराज झाला. त्यावर मिलरने सुंदरकडे धाव घेत प्रतिक्रिया दिली आणि दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मैदानावरील पंच ख्रिस गॅफनी यांनी लगेच हस्तक्षेप करून दोघांमधील वाद थांबवला. सामान्यतः शांत स्वभावाचे असलेले सुंदर आणि मिलर यांच्यात झालेल्या या वादामुळे क्षणभर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. सुंदर वादानंतर जातानाही त्याच्याकडे रोखून पाहत होता. नंतर ‘ड्रिंक्स ब्रेक’दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमनेही हस्तक्षेप करत परिस्थिती शांत केली.

दक्षिण आफ्रिकेची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्यांनी फक्त २० धावांत तीन विकेट्स गमावल्या. त्यानंतर डेवाल्ड ब्रेव्हिस आणि डेव्हिड मिलर यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दोघांनीही सावध सुरुवात केली पण नंतर मोठे फटके खेळायला सुरुवात केली. ब्रेविस बाद झाल्यानंतर, मिलरला ट्रिस्टन स्टब्सने साथ दिली.

मिलरने ३५ चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांसह ६३ धावांची उत्कृष्ट खेळी केली, यासह २० षटकांत दक्षिण आफ्रिकेने १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडिया फक्त १११ धावांवर ऑलआउट झाली. शिवम दुबे वगळता भारताचे सर्व फलंदाज या सामन्यात फेल ठरले. ज्यामुळे संघाला मोठा पराभव पत्करावा लागला आहे.