गुवाहाटी : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात बेजबाबदार फटका मारून बाद झाल्यावर भारतीय कर्णधार ऋषभ पंतला बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, वॉशिंग्टन सुंदरने आपल्या सहकाऱ्याची पाठराखण केली. पंतच्या आक्रमक शैलीत खेळण्याच्या योजनेला दोष देता येणार नाही. प्रत्येक वेळी योजनेला यश मिळण्याची शाश्वती नसते, असे वॉशिंग्टन म्हणाला.

डावखुऱ्या पंतला केवळ सात धावाच करता आल्या. भेदक मारा करत असलेल्या मार्को यान्सनच्या गोलंदाजीवर त्याने क्रीजबाहेर येऊन शरीरापासून बराच दूर असलेला चेंडू ‘ऑफ’च्या दिशेने टोलविण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन थेट दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक काएल व्हेरेनेच्या ग्लोव्हजमध्ये गेला. त्याआधी ध्रुव जुरेलही खराब फटका मारून बाद झाला होता.

‘‘अन्य एखाद्या दिवशी, चेंडू सीमारेषेबाहेर गेला असता आणि सर्वांनी फलंदाजाचे कौतुक केले असते. प्रत्येक वेळी तुमच्या योजनेला यश मिळेलच असे नाही. मात्र, तुम्ही प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा,’’ असे वॉशिंग्टन म्हणाला.

‘‘पंतने यापूर्वी अनेकदा अशा प्रकारचे फटके मारून मोठ्या धावा केल्या आहेत. जुरेलबाबतही हेच म्हणता येईल. त्यांची योजना योग्यच होती. केवळ त्यांना या योजनेची अंमलबजावणी अधिक चांगल्या पद्धतीने करता आली असती,’’ असे वॉशिंग्टनने नमूद केले.

खेळपट्टीला दोष नाही

दक्षिण आफ्रिकेच्या ४८९ धावांच्या प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २०१ धावांतच आटोपला. भारतीय फलंदाजाच्या निराशाजनक कामगिरीसाठी खेळपट्टीला दोष देता येणार नाही, असे वॉशिंग्टन म्हणाला. ‘‘खेळपट्टीवर चेंडूला चांगली उसळी मिळते आहे. फलंदाज म्हणून तुम्ही खेळपट्टीवर वेळ घालवला, तर धावा करणे निश्चितपणे शक्य होते,’’ असे वॉशिंग्टन म्हणाला. ‘‘यान्सनने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याला उंचीचाही फायदा झाला. त्याचे चेंडू अतिरिक्त उसळी घेत होते, त्यामुळे त्याच्याविरुद्ध फलंदाजी करणे आव्हानात्मक ठरले,’’ असे वॉशिंग्टनने सांगितले.