‘पाकिस्तान सुपर लीग सुरू होऊन १० वर्ष लोटली पण या स्पर्धेच्या माध्यमातून पाकिस्तान संघाला एकही फलंदाज मिळालेला नाही. या स्पर्धेने काही गोलंदाज नक्कीच दिले पण उल्लेखनीय म्हणावा असं फलंदाज या स्पर्धेच्या माध्यमातून समोर आलेला नाही’, असं परखड मत महान गोलंदाज आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार वासिम अक्रम यांनी म्हटलं आहे.

‘जेव्हा आम्ही वैभवसारख्या प्रतिभाशाली खेळाडूंची गुणवत्ता हेरू, त्यांना बहरण्यासाठी मदत करू तेव्हाच चांगले क्रिकेटपटू घडू शकतील. टॅलेंट स्काऊटची शिस्तबद्ध यंत्रणा उभी राहायला हवी. देशाच्या कानाकोपऱ्यात खेळणाऱ्या युवा खेळाडूंचा खेळ पाहून आंतरराष्ट्रीय पातळीवर कोण खेळू शकेल हे समजू शकणारा चमू हवा’, असं अक्रम म्हणाले.

१५वर्षीय वैभव सूर्यवंशीने भारतासाठी टी२० प्रकारात प्रतिनिधित्व केलं आहे. आयपीएल स्पर्धेत यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली आहे. जगभरातल्या दर्जेदार गोलंदाजांची तो नियमित धुलाई करत आहे. त्याला रोखायचं कसं असा प्रश्न गोलंदाजांना पडतो आहे.

‘कसोटी प्रकारात कामगिरी चांगली व्हावी असं वाटत असेल तर क्लब क्रिकेटचा दर्जा सुधारणं हा एकमेव मार्ग आहे. कराची आणि लाहोर शहरात १०० मिलिअन रुपयांची गुंतवणूक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने करायला हवी. या भागातून अनेक गुणी क्रिकेटपटू पुढे येतात’, असं अक्रम यांनी सांगितलं.

पाकिस्तान क्रिकेटमध्ये अंतर्गत बंडाळ्या मोठ्या प्रमाणावर आहेत. पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तानने दोन कसोटी गमावल्या. दुसऱ्या कसोटीनंतर बोर्डाने अनाकलनीय असा निर्णय घेत ७ खेळाडू आणि २ प्रशिक्षकांना मायदेशी पाठवलं. कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळणाऱ्या सईम अयुबाला इंग्लंडमध्ये बोलावलं. वनडे आणि टी२० प्रशिक्षकांना कसोटी संघाची जबाबदारी दिली. निम्म्यापेक्षा जास्त खेळाडूंना घरी पाठवून अचानक कामगिरी सुधारू शकते का? असा सवाल क्रिकेटरसिक करत आहेत. तिसरी कसोटीही पाकिस्तान गमावण्याच्या मार्गावर आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानचे फलंदाज निष्प्रभ ठरले. त्यासंदर्भात अक्रम बोलत होते.