Wasim Akram expresses deep concern for Imran Khan health: पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू व कर्णधार इम्रान खान यांच्याबाबत सातत्याने चर्चा सुरू होत आहे. इम्रान खान हे २०२२ पासून तुरूंगात असून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत आता पाकिस्तानचा माजी गोलंदाज इम्रान खानने सुद्धा वक्तव्य केलं आहे. अक्रमने इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली असून, त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये आणि त्यांना उत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी मागणी केली आहे.

७३ वर्षीय इम्रान खान २०२२पासून तुरुंगात आहेत. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये दोषी ठरल्यानंतर त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, इम्रान यांनी हे आरोप फेटाळले आहेत. अक्रमने म्हटलं की, कायदेशीर प्रक्रिया आपल्या मार्गाने सुरू राहिली पाहिजे; मात्र इम्रान यांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता कामा नये.

वसीम अक्रम इम्रान खानबद्दल काय म्हणाला?

The Athleticशी बोलताना वसीम अक्रम म्हणाला, “मी गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्याशी बोललेलो नाही. राजकीयदृष्ट्या त्यांच्याबरोबर जे काही घडत आहे, ते दुर्दैवी आहे. न्यायालयीन प्रक्रिया ही न्यायालयीन प्रक्रियाच आहे. मात्र, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा कोणतीही तडजोड केली जाऊ नये.”

पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाने यावेळी भावनिक आवाहनही केलं. इम्रान खानबाबत आपण केलेलं वक्तव्य कोणत्याही राजकीय भूमिकेतून नाही, तर मित्र म्हणून असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यातून केलं असल्याचं अक्रमने स्पष्ट केलं. “मी मनापासून बोलत आहे. एक व्यक्ती म्हणून मला त्यांची काळजी वाटते आणि त्यांच्या आरोग्याबाबत मला चिंता आहे. ते दोषी ठरले असतील किंवा नसतील, तुरुंगात असोत किंवा नसोत आपल्याला त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. नेमकं काय घडत आहे, याबाबत आपल्याला माहिती नाही. सरकारकडून त्यांची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं जात आहे, पण मला चिंता वाटते. मी त्यांना खूप मिस करतोय,” असं वसीम अक्रम पुढे म्हणाला.

वसीम अक्रम म्हणाला की, “इंग्लंड आणि इतर ठिकाणी इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत निदर्शने होत आहेत, पण पाकिस्तानमध्ये तसं काही घडत आहे की नाही, हे मला माहीत नाही. यानंतर इथे (पाकिस्तानमध्ये) थोडा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर मी वाचलं की पाकिस्तान सरकारने इम्रान खान यांच्या किती भेटी झाल्या, त्यांना किती फोन कॉल्स आले, यासह सगळी आकडेवारी जाहीर केली. मात्र, सध्या नेमकं काय खरं आहे, यावर विश्वास ठेवणं आणि काय खरं मानावं हे ठरवणं खूप कठीण आहे.”